AI Revolution: AI मुळे 'टेक विश्वात काही तरी मोठं घडतंय', पुढील 5 वर्षांत मोठी उलथापालथ होणार; AI कंपनीच्या CEO चा इशारा

AI Job Disruption: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) जगभरात मोठे बदल सुरू झाले आहेत. पुढील 1 ते 5 वर्षांत अनेक व्हाइट-कॉलर नोकऱ्या नाहीशा होऊ शकतात किंवा पूर्णपणे बदलतील, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
AI Revolution
AI RevolutionPudhari
Published on
Updated on

Matt Shumer OthersideAI CEO Explained AI Impact Essay

AI मुळे जग झपाट्याने बदलत आहे. कोविडच्या आधी जगात काहीतरी घडणार आहे अशी कुजबुज सुरू झाली होती, तसाच आजचा काळ आहे, फरक एवढाच की यावेळी संकट एखाद्या विषाणूमुळे नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (Artificial Intelligence – AI) येणार आहे.

टेक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, आपण सध्या AI क्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. पुढील दोन ते पाच वर्षांत जगभरातील लाखो नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. काही नोकऱ्या नाहीशा होतील, तर काही नोकऱ्यांचं स्वरुप पूर्णपणे बदलेलं असेल. ही फक्त भविष्यवाणी नाही. तर हे बदल सध्या सुरू झाले आहेत.

आज AI क्षेत्रात काम करणारे अनेक तज्ज्ञ सांगतात की, त्यांच्या स्वतःच्या कामाचा मोठा भाग आता AI करत आहे. जगातील काही मोजक्याच कंपन्या जसं की OpenAI, Anthropic आणि Google DeepMind या प्रचंड वेगाने नवी मॉडेल्स तयार करत आहेत. या कंपन्यांमधील काहीशे संशोधक प्रत्यक्षात संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचं भविष्य घडवत आहेत, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.

'मी फक्त कमांड देतो… AI बाकी सगळं करतं'

मॅट शुमर या AI तज्ज्ञाचा अनुभव धक्कादायक आहे. तो सांगतो, “आज मी संगणकावर बसून फक्त एवढंच लिहितो की, मला असं अ‍ॅप बनवायचं आहे. याचं डिझाइन असं असावं, युजरचा वापर असा असावा. त्यानंतर मी चार तास दुसरं काम करतो. परत येतो तेव्हा अ‍ॅप तयार असतं.” कोड लिहिणं, तपासणं, चुका शोधणं, पुन्हा सुधारणा करणं, हे सगळं AI स्वतः करत आहे. आधी माणूस AI ला मार्गदर्शन करायचा. आता AI स्वतः निर्णय घेत आहे. हे अतिशयोक्ती वाटू शकतं, पण टेक इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांसाठी हे रोजचं काम झालं आहे.

कोणत्या नोकऱ्या सर्वाधिक धोक्यात?

AI फक्त एक स्किल शिकत नाही. ते एकाच वेळी वाचणं, लिहिणं, विश्लेषण करणं, निर्णय घेणं, संवाद साधणं हे सगळं शिकत आहे.

त्यामुळे खालील क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे:

  • कायदा (Legal)

  • अकाउंटिंग आणि ऑडिट

  • फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिसिस

  • मेडिकल रिपोर्टिंग

  • कस्टमर सपोर्ट

  • कंटेंट रायटिंग आणि मीडिया

  • डेटा अ‍ॅनालिसिस

  • कन्सल्टिंग

  • HR आणि भरती प्रक्रिया

AI तज्ज्ञांच्या मते, पुढील 1 ते 5 वर्षांत एन्ट्री-लेव्हल व्हाइट कॉलर नोकऱ्यांपैकी जवळपास 50 टक्के नोकऱ्या नाहीशा होऊ शकतात. पूर्वी यंत्रांनी कारखान्यातील काम कमी केलं. मग कॉम्प्युटरने ऑफिसमधील काही कामं कमी केली. पण AI वेगळा आहे कारण तो मेंदूचं काम करत आहे.

'मी AI वापरून पाहिलं… पण'

अनेकांनी 2023–24 मध्ये AI टूल्स वापरली आणि त्यांना ते फार प्रभावी वाटली नाहीत. कारण ते जुने मॉडेल्स होते. आजची AI प्रणाली त्या तुलनेत प्रचंड प्रगत आहे. AI तज्ज्ञ मॅट शुमर सांगतात, मोफत AI वापरून निष्कर्ष काढणं म्हणजे आजच्या स्मार्टफोनची क्षमता जुन्या बटणाच्या फोनवरून मोजण्यासारखं आहे. त्यामुळे पैसे भरुन AI टूल्सचा वापर करा, त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील.

आज मोठ्या लॉ फर्म्समधील पार्टनर्स, फायनान्स कंपन्यांतील मॅनेजर्स, डॉक्टर आणि स्टार्टअप संस्थापक AI ला “डिजिटल सहकारी” म्हणून वापरत आहेत. काही जण तर दिवसाचे 2–3 तास AI सोबत काम करतात. एका वरिष्ठ वकिलाने सांगितलं की, “AI जर याच वेगाने सुधारत राहिला, तर काही वर्षांत माझं बहुतांश काम तो करू शकेल.”

AI Revolution
AI Prediction: पुढील पाच वर्षांत IT सेवा बंद होणार; AI समिटआधी विनोद खोसला यांचा मोठा इशारा, नोकऱ्यांच काय होणार?

मग सामान्य माणसाने काय करायचं?

AI तज्ज्ञ मॅट शुमर सांगतात:

1) AI शी आत्ताच मैत्री करा

फक्त प्रश्न विचारण्यासाठी नाही. तुमचं रोजचं काम AI कडून करुन घ्या. रिपोर्ट, एक्सेल शीट, ईमेल ड्राफ्ट, डेटा अ‍ॅनालिसिस हे सगळं.

2) आर्थिक तयारी ठेवा

बचत वाढवा, अनावश्यक कर्ज टाळा. माझी नोकरी सुरक्षित आहे, असा अति आत्मविश्वास ठेवू नका.

3) बदल स्वीकारण्याची सवय लावा

नवीन टूल शिकणं, पुन्हा पुन्हा सुरुवातीपासून शिकायला तयार राहणं, हीच पुढील काळात खरी ताकद आहे.

4) लोकांशी नातं जपा

विश्वास, अनुभव, प्रत्यक्ष संपर्क हे AI लगेच बदलू शकत नाही. अशी कामं काही काळ तरी सुरक्षित राहतील.

मुलांच्या शिक्षणाबाबतही विचार बदलावा लागेल

आज पालक मुलांना सांगतात चांगले मार्क्स मिळाले म्हणजे चांगलं कॉलेज मिळेल आणि नंतर स्थिर नोकरी लागेल. पण तज्ज्ञ सांगतात, उद्याचं जग वेगळं असेल. AI सोबत काम करता येईल अशी कौशल्यं, सर्जनशील विचार, जिज्ञासा आणि सतत शिकण्याची तयारी, हेच पुढील पिढीसाठी अधिक महत्त्वाचं असणार आहे.

AI Revolution
FMCG Shift: प्रीमियम उत्पादनांना ब्रेक लागणार; ग्रामीण मागणी वाढताच FMCG कंपन्यांचा स्वस्त पॅकवर भर

संकटाबरोबर संधीही आहेत

या संकटात संधीही आहेत. आज कोणालाही स्वतःचं अ‍ॅप बनवता येतं, पुस्तक लिहिता येतं, नवीन कौशल्य शिकता येतात, व्यवसाय सुरू करता येतो. पूर्वी जे काम लाखो रुपये आणि मोठ्या टीम सोबत करावं लागायचं, आज तेच काम एका लॅपटॉपवर शक्य होत आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक, सल्लागार आणि डेव्हलपर आता प्रत्येकाच्या खिशात आहेत, फक्त वापरण्याची तयारी हवी.

AI हे भविष्यात येणारं संकट नाही. ते आधीच आपल्या आयुष्यात आलं आहे. जे लोक लवकर समजून घेतील, लवकर जुळवून घेतील, ते पुढे जातील. जे दुर्लक्ष करतील त्यांना अचानक मोठा धक्का बसू शकतो. ही फक्त टेक इंडस्ट्रीची गोष्ट नाही. ही जगातील प्रत्येक माणसाचं भविष्य बदलणारी क्रांती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news