Violence Against Women : मागील वर्षी २०२४ मध्ये जगात दर १० मिनिटांना एका महिलेची तिच्या जवळच्या व्यक्तीकडून हत्या झाली. वर्षभरात सुमारे ५०,००० महिला आणि मुलींना आपला जीव गमवावा लागला, अशी धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालातून जाहीर करण्यात आली आहे. महिला हिंसाचार प्रश्नाविरोधातील लढ्यात कोणतीही प्रगती झाली नसल्याबद्दलही संयुक्त राष्ट्रांनी निषेध व्यक्त केला आहे.
२०२४ मध्ये सुमारे ५०,००० महिला आणि मुलींची हत्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा कुटुंबातील सदस्यांनी केली, असे संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्ज अँड क्राइम ऑफिस आणि यूएन वुमन यांनी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
११७ देशांमधून मिळालेल्या माहितीनुसार, ५०,००० हा आकडा दररोज १३७ महिला किंवा दर १० मिनिटांना एका महिलेच्या हत्येचा संकेत देतो. २०१९ च्या तुलनेत ही एकूण संख्या किंचित कमी दिसत असली तरी, ही घट खऱ्या अर्थाने कमी झाली आहे असे नाही. देशांनुसार माहिती उपलब्धतेत असलेल्या फरकामुळे ही आकडेवारी बदललेली दिसत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२३ मध्ये नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा ही एकूण संख्या थोडी कमी आहे. प्रत्यक्षात घट झाल्याचे दिसून येत नाही, कारण ती मुख्यत्वे देशनिहाय डेटा उपलब्धतेतील फरकांमुळे आहे, असेही अहवालात नमूद आहे.
दरवर्षी हजारो महिला आणि मुलींचे बळी स्त्रीहत्या होत आहेत. त्यात सुधारणा झाल्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही आणि “हत्येच्या जोखमीच्या बाबतीत घर महिला आणि मुलींसाठी सर्वात धोकादायक ठिकाण राहिले आहे,” असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जगातील सर्वच देशांमध्ये महिलांची हत्या होते, परंतु गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये आफ्रिकेत महिलांच्या हत्येची संख्या सर्वाधिक होती. सुमारे २२,००० महिलांनी आपला जीव गमावला, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. “स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची सुरुवात ही धमक्या आणि छळपासून होते – ऑनलाइनसह,” असे संयुक्त राष्ट्र महिला धोरण विभागाच्या संचालक सारा हेंड्रिक्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
या अहवालाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या धोरण विभागाच्या संचालक सारा हेंड्रिक्स यांनी म्हटलं आहे की, “स्त्रीहत्या ही अचानक होणारी घटना नाही. हत्येपूर्वी तिला अनेकदा धमक्या आणि छळाला सामोरे जावे लागते. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे महिला आणि मुलींवरील काही प्रकारच्या हिंसाचारांना प्रोत्साहन मिळाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विनासंमती सोशल मीडियावर फोटो शेअर करणे, डॉक्सिंग आणि डीपफेक व्हिडिओ यांसारख्या नवीन प्रकारातून मानसिक छळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे महिला आणि मुलींना हिंसाचाराला सामोरे जावे लागते. आता हे अत्याचार थांबविण्यासाठी जगभरात कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि गुन्हेगारांना प्रकरण जीवघेणे होण्यापूर्वीच जबाबदार धरणे गरजेचे आहे,” असे आवाहन हेंड्रिक्स यांनी केले आहे.