प्रतीकात्मक छायाचित्र. Pudhari Photo.
आंतरराष्ट्रीय

heatwave health risk| सावधान! वाढती उष्णता ठरणार जीवघेणी : २०५० पर्यंत दरवर्षी ७ लाख मृत्यूंचा धोका! नवीन संशोधन काय सांगते?

heatwave health risk 2050|सुमारे ३.६८ अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसानही सोसावे लागण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

heatwave health risk 2050

लंडन : मागील काही वर्षांमध्‍ये हवामान बदलामुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ लागले आहेत. 'द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ' या प्रसिद्ध नियतकालिकातील एका नवीन अभ्यासानुसार, २०५० सालापर्यंत वाढत्या उष्णतेमुळे जगभरात दरवर्षी ४.७० लाख ते ७ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच वाढत्‍या उष्‍ण हवामानामुळे लोकांच्या कामावर परिणाम होऊन सुमारे ३.६८ अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसानही सोसावे लागण्याची शक्यता आहे. जाणून घेवूया नवीन संशोधनात नेमकं काय म्‍हटलं आहे. संशोधकांनी कोणते उपाय सूचवले आहेत याविषयी...

वाढत्‍या उष्‍णतेमुळे शरीरावर नेमका कोणता परिणाम होतो?

संशोधकांनी २००० ते २०२२ या कालावधीतील १५६ देशांच्या माहितीचा अभ्यास केला. त्यांना असे आढळले की, जेव्हा उष्णता वाढते तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण आणि घाम येण्याचे प्रमाण वाढते. याचा थेट परिणाम हृदयावर ताण येण्यात होतो, शरीरातील पाणी कमी (डीहायड्रेशन) होते. प्रचंड थकवा जाणवू लागतो. या सगळ्यामुळे साहजिकच माणसाची हालचाल कमी होते आणि आळस किंवा निष्क्रियता वाढते.उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण एसी (AC) मध्ये बसणे पसंत करतो. एसीमुळे गारवा मिळत असला, तरी त्यामुळे एकाच जागी बसून राहण्याची सवय लागते. अशा प्रकारे उष्णता आणि हालचाल न करण्याची सवय हे एक 'दुष्टचक्र' बनत चालले आहे, असे नवीन संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे.

जगातील दर ३ पैकी १ व्यक्ती करतो 'डब्लू.एच.ओ.'च्‍या नियमांकडे दुर्लक्ष

सध्या जगातील दर ३ पैकी १ व्यक्ती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुचवलेल्या व्यायामाच्या नियमांचे पालन करत नाही. निरोगी राहण्यासाठी आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम व्यायाम किंवा ७५ मिनिटे जोरकस व्यायाम करणे आवश्यक असते. व्यायामाचा अभाव आणि वाढती उष्णता अशीच सुरू राहिली, तर स्नायूंची ताकद कमी होणे आणि नीट झोप न लागणे, विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता (आकलनशक्ती) मंदावणे, सततचा थकवा आणि आजारपणामुळे कामावर गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढेल आणि कामाचा दर्जाही खालावेणे असे गंभीर परिणाम होवू शकतात.

हवामान आणि व्यायामाचा अभाव यांचा काय संबंध?

या अभ्यासामुळे हवामान आणि व्यायामाचा अभाव यांचा असलेला संबंध समोर आला आहे. वाढत्‍या उष्‍णतेमुळे दक्षिण आशिया, मध्य-पूर्व आणि आफ्रिकेसारख्या उष्ण हवामानाच्या भागात लोक शारीरिक हालचाली कमी करतात, असे दिसून आले आहे. याउलट, मध्य आशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या सौम्य हवामान असलेल्या ठिकाणी लोक अधिक सक्रिय असतात. मात्र, उत्तर अमेरिका आणि अर्जेंटिनासारख्या अतिशय थंड प्रदेशांतही शारीरिक निष्क्रियतेचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे.

भारतासाठी चिंतेची बाब

हवामान आणि व्यायामाचा अभाव यांचा असलेला संबंध स्‍पष्‍ट होणे हे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे, कारण व्यायामाच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०५० पर्यंत दर एक लाख लोकसंख्येमागे १०.६२ पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उन्‍हामुळे होतील कामाचे तास कमी

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) मते, २०३० सालापर्यंत वाढत्या उष्णतेमुळे जगभरातील कामावर मोठा परिणाम होईल. कडाक्याच्या उन्हामुळे कामाचे एकूण तास २.२ टक्क्यांनी कमी होतील, ज्याचा अर्थ सुमारे ८ कोटी पूर्णवेळ नोकऱ्यांचे नुकसान होण्यासारखे आहे. याचा सर्वाधिक फटका शेती (६० टक्के) आणि बांधकाम (१९ टक्के) क्षेत्राला बसणार आहे. विशेषतः दक्षिण आशिया आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये उष्णतेमुळे कामाचे साधारण ५ टक्के तास वाया जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संशोधकांनी कोणते उपाय सूचवले ?

संशोधकांच्या मते, व्यायाम किंवा शारीरिक हालचाल ही केवळ आवडीची बाब न राहता, बदलत्या हवामानानुसार ती आता एक गरज बनली आहे. वाढत्या उष्णतेमुळे लोक एका जागी बसून राहणे पसंत करत आहेत, ज्यामुळे आरोग्याचे नुकसान आणि आर्थिक फटका बसू शकतो. हे टाळण्यासाठी संशोधकांनी पुढील उपाय सूचवले आहेत....

  • व्यायामाच्या नियमावलीत उष्णतेपासून बचावाचे संदेश देणे.

  • चालण्यासाठी जास्तीत जास्त सावली असलेले रस्ते तयार करणे.

  • ज्यांना उष्णतेचा त्रास होऊ शकतो अशा लोकांसाठी वातानुकूलित व्यायामशाळांना सवलत देणे.

  • कामाच्या ठिकाणी उष्णतेपासून संरक्षणाचे कडक नियम लागू केल्यास लोकांचे आरोग्य सुधारेल. तसेच शहरांमधील राहणीमान सुसह्य होईल आणि प्रदूषणाचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT