

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
भूक लागल्यानंतरच दिवसातून फक्त दोन वेळा जेवा. पोटाला कचऱ्याची पेटी बनवू नका, असा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी रविवारी दिला. हॉटेल सयाजी येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आयोजित केएमए कॉन वैद्यकीय परिषदेच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. दीक्षित म्हणाले, दिवसातून दोन वेळा जेवल्याने आरोग्य चांगले राहते.
अनेकजण भूक नसतानाही जेवतात. हे चुकीचे आहे. भूक लागल्यानंतर जेवा आणि मध्ये काहीच खाऊ नका. यामुळे वजन कमी होते, तसेच मधुमेह टाळता येतो किंवा झालेल्या मधुमेहावर नियंत्रण राहते. अनेकांनी अशी आहारपद्धती स्वीकारून आरोग्य सुधारले आहे.
त्यामुळे आम्ही हे अभियान सर्वत्र राबवत आहे. बेंगलुरू येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आय. बी. विजयालक्ष्मी म्हणाल्या, पौराणिक ग्रंथांनुसार हृदय हे ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्यासारखे आहे. हृदय निरोगी असेल, तरच संपूर्ण शरीर निरोगी असते.
मीठ, मैदा, साखर, डालडा हे पदार्थ आरोग्यास हानीकारक आहेत. त्यामुळे त्याचे सेवन कमी करा. व्यसनापासून दूर राहून सकारात्मक विचार करा. योग तज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, शरीर आणि मनाचे कार्य भिन्न आहे. योग साधना करताना मन शांत ठेवणे आवश्यक आहे. 202 OTHOUT तणावमुक्तीसाठी योग सर्वात प्रभावी उपाय आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. संदीप पाटील, डॉ. किरण दोशी, डॉ. शिवशंकर मरजक्के, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. शरद टोपकर, डॉ. शीतल पाटील, डॉ. गौरी साई प्रसाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.