प्रातिनिधिक छायाचित्र. 
आंतरराष्ट्रीय

US military tracking AI| चीनचा नवा डाव! AI चा वापर करून अमेरिकन सैन्याच्या हालचालींवर ठेवली जातेय नजर

US military tracking AI | इराण युद्धादरम्यान अमेरिकन सैन्याच्या हालचाली "उघड" करणार्‍या साधनांची चिनी खासगी कंपन्यांकडून विक्री

पुढारी वृत्तसेवा

US military tracking AI

वॉशिंग्टन: इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या लष्करी हालचालींचा मागोवा घेण्यासाठी चिनी कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ओपन-सोर्स डेटाचा वापर करत आहेत. यामुळे युद्धभूमीवरील देखरेखीच्या वाढत्या जोखमीबाबत वॉशिंग्टनमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकन सैन्याच्या हालचाली उघड केल्‍याचा दावा

'द वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, इराण युद्धापासून चीनने स्वतःला अलिप्‍त ठेवले आहे. मात्र अनेक चिनी खासगी कंपन्या अशा गुप्तचर साधनांचे मार्केटिंग करत आहेत ज्याद्वारे अमेरिकन सैन्याच्या हालचाली उघड करण्याचा दावा केला जात आहे.

अमेरिकन लष्करी तैनातीचे सविस्तर विश्लेषण

या कंपन्या सॅटेलाईट इमेजरी (उपग्रह चित्रे), फ्लाईट ट्रॅकर्स आणि जहाजांच्या वाहतुकीची माहिती यांसारख्या सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या डेटासोबत AI ची जोड देत आहेत. याद्वारे मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तैनातीचे सविस्तर विश्लेषण केले जात आहे. पाच आठवड्यांपूर्वी इराण युद्ध सुरू झाल्यापासून या कलमाला वेग आला आहे.

सोशल मीडियाचाही वापर

सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अमेरिकन विमानवाहू जहाजांच्या हालचाली, विमानांचे स्थान आणि लष्करी तळांवरील हालचालींचा तपशील देणारे पोस्ट व्‍हायरल होत आहे. विश्लेषकांच्या मते, ही वेगाने विस्तारणाऱ्या 'इंटेलिजन्स मार्केटप्लेस'ची चिन्हे आहेत.

काही कंपन्‍यांचे संबंध थेट चीनच्‍या लष्‍करी व्‍यवस्‍थेशी

यातील काही कंपन्यांचे संबंध थेट चीनच्या लष्करी व्यवस्थेशी आहेत. चीनच्या 'नागरी-लष्करी एकात्मता' धोरणांतर्गत खासगी क्षेत्रातील नवकल्पनांचा संरक्षण क्षमतेत समावेश करण्यासाठी सरकारकडून मोठी गुंतवणूक केली जात आहे, ज्याचा हा एक भाग असल्याचा दावाही 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने केला आहे.

'चीनची संरक्षण क्षमता वाढेल'

"चीनमधील सक्षम खासगी भू-स्थानिक विश्लेषण कंपन्यांच्या प्रसारामुळे चीनची संरक्षण क्षमता वाढेल आणि संकटकाळात अमेरिकन दलांना आव्हान देण्याची त्यांची ताकद वाढेल," असे अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटचे फेलो रायन फेडास्युक यांनी म्‍हटलं आहे.

अमेरिकन लष्करी हालचाली ट्रॅक केल्‍याचाही दावा

रिपोर्टनुसार, एका कंपनीने दावा केला आहे की ते पाश्चात्य आणि चिनी डेटा स्रोतांचा वापर करून AI द्वारे रिअल-टाइममध्ये अमेरिकन लष्करी हालचाली ट्रॅक करू शकतात. दुसऱ्या एका कंपनीने विमानांच्या संवादाचे विश्लेषण करून मोठ्या प्रमाणावरील लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.

आधुनिक युद्धातील बदल

अशा कंपन्यांचा उदय आधुनिक युद्धातील मोठ्या बदलाचे प्रतीक ठरले आहे. एकेकाळी फक्त तज्ज्ञ विश्लेषकांपुरती मर्यादित असलेली 'ओपन-सोर्स इंटेलिजन्स' (OSINT) आता AI मुळे अधिक शक्तिशाली झाली आहे. यामुळे पूर्वी फक्त सरकारांकडे असणारी माहिती आता खासगी संस्थांनाही मिळणे शक्य झाले आहे. . हाऊस सिलेक्ट कमिटी ऑन चायना यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "चीनी कम्युनिस्ट पार्टीशी (CCP) संबंधित कंपन्या AI ला अमेरिकेविरुद्ध युद्धभूमीवरील देखरेखीचे साधन म्हणून वापरत आहेत."

चीनची दुहेरी चाल

एकीकडे चीनने अमेरिका, इस्‍त्रायल, इराण संघर्षात शांतता चर्चा आणि युद्धविरामाचे आवाहन करून सावध भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे त्यांचे खासगी क्षेत्र या युद्धाचा धोरणात्मक फायदा घेत आहे. संरक्षण विश्लेषकांनी म्‍हटलं आहे की, या दुहेरी धोरणामुळे चीनला थेट युद्धात न उतरता सामरिक लाभ मिळत आहेत आणि सरकारला यापासून हात झटकण्याची संधीही मिळते. व्यावसायिक तंत्रज्ञान अधिक शक्तिशाली होत आहे, तसतसे नागरी आणि लष्करी गुप्तचर माहितीमधील अंतर पुसत चालले आहे, ज्यामुळे लष्करी गुप्तता पाळणे कठीण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT