

तेहरान : इराणने आपली लष्करी शक्ती केंद्रित ठेवण्याऐवजी ती पूर्णपणे विभागून ‘मोझॅक डिफेन्स डॉक्ट्रीन’ लागू केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पेंटागॉन इराणच्या संरक्षण धोरणामुळे पेचात पडले आहेत. या नव्या रणनीतीनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या 31 प्रांतीय युनिट्सना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक कमांडरना युद्धाच्या वेळी कोणत्याही हल्ल्याचा निर्णय घेण्यासाठी तेहरानमधील मुख्य नेतृत्वाच्या परवानगीची वाट पाहावी लागत नाही.
इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या मध्यवर्ती कमांड स्ट्रक्चरला लक्ष्य केल्यानंतर इराणने हे पाऊल उचलले असून, यामुळे अमेरिकेला अफगाणिस्तान आणि व्हिएतनामसारख्या प्रदीर्घ युद्धाच्या छायेत ओढले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणच्या या मोझॅक रणनीतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर वापर. इराणमधील खडतर डोंगररांगा आणि अफाट वाळवंट परकीय सैन्यासाठी मृत्यूचा सापळा ठरू शकतात. इराणने आपल्या सैन्याला 31 स्वतंत्र तुकड्यांमध्ये विभागले असून, प्रत्येक तुकडीकडे स्वतःचे क्षेपणास्त्र, ड्रोन आणि गनिमी काव्याचे तंत्र आहे.
अमेरिकेने कितीही आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर वापरून इराणची मुख्य दळणवळण यंत्रणा ठप्प केली, तरी हे प्रांतीय कमांडर आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे युद्ध सुरू ठेवू शकतात. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, हे युद्ध कधी आणि कसे संपवायचे याचा अंतिम अधिकार आता इराणने आपल्या हातात ठेवला आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इराणमध्ये जमिनीवर सैन्य उतरवण्याचा विचार करत असले, तरी ही मोझॅक स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी वॉटरलू ठरू शकते. केवळ हवाई हल्ल्यांनी इराणमधील सत्तापालट करणे अशक्य आहे आणि जर अमेरिकन सैन्य जमिनीवर उतरले, तर त्यांना गनिमी काव्याचा सामना करावा लागेल. रशिया-युक्रेन युद्धाच्या अनुभवावरून अमेरिका आणि इस्रायल सावध आहेत, कारण दीर्घकाळ चालणारे युद्ध आक्रमक देशाची आर्थिक आणि लष्करी ताकद संपवून टाकते. इराणचे उद्दिष्ट अमेरिकेला अशा जाळ्यात अडकवण्याचे आहे, जिथून बाहेर पडणे अशक्य होईल.
अशी आहे मोझॅक डिफेन्स
मोझॅक डिफेन्स ही इराणची एक अत्यंत चतुर आणि विकेंद्रित लष्करी रणनीती असून, त्याअंतर्गत संपूर्ण देशाची 31 स्वतंत्र लष्करी विभागांत विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये राजधानी तेहरानसाठी एक आणि उर्वरित 30 प्रांतांसाठी प्रत्येकी एक युनिट कार्यरत आहे. या धोरणाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक कमांडरना दिलेली पूर्ण स्वायत्तता. ज्यामुळे युद्धाच्या काळात क्षेपणास्त्रे डागणे, ड्रोन हल्ले करणे किंवा गनिमी काव्याने लढणे यासाठी त्यांना मध्यवर्ती मुख्यालयाकडून कोणत्याही परवानगीची किंवा आदेशाची वाट पाहावी लागत नाही.
अमेरिकेपुढील मुख्य आव्हाने
इराणच्या या नव्या युद्धनीतीमुळे अमेरिकेसमोर मोठी आव्हाने उभी ठाकली असून, विशेषतः इराणचा खडतर भूगोल हा अफगाणिस्तान आणि व्हिएतनामप्रमाणेच अमेरिकन सैन्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. इराणच्या ‘डिफेन्स इन डेप्थ’ या धोरणामुळे युद्ध दीर्घकाळ खेचले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आक्रमक सैन्याची ताकद आणि संयम दोन्ही संपू शकतात. तसेच, केवळ हवाई हल्ल्यांनी इराणमध्ये सत्तापालट करणे अशक्य आहे.