

US Iran war
वॉशिंग्टन: इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी नेतृत्वात मोठे फेरबदल केले आहेत. अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीने पद सोडण्याचे आणि 'सक्तीने निवृत्त' होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी हे निर्देश जारी केले असून, अमेरिकेच्या या अचानक हालचालीमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.
जनरल रँडी जॉर्ज यांनी अद्याप अधिकृतपणे राजीनामा दिलेला नाही. मात्र, संरक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर ते लवकरच आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणविरुद्ध संभाव्य जमिनीवरील लष्करी कारवाईची तयारी सुरू केली असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यपूर्वेत अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहेत.
जनरल रँडी जॉर्ज हे वेस्ट पॉईंट मिलिटरी अकादमीचे पदवीधर असून त्यांनी आखाती युद्ध, इराक आणि अफगाणिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जो बायडेन यांच्या कार्यकाळात २०२३ मध्ये त्यांची लष्करप्रमुख पदी नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत असतानाच त्यांना मुदतीपूर्वी पद सोडावे लागत आहे.
जनरल जॉर्ज यांच्या हकालपट्टीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत जनरल जॉर्ज यांच्या क्षमतेवर प्रशासनाला शंका होती. संरक्षण मंत्री हेगसेथ यांना अशा नेतृत्वाची गरज आहे, जे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ध्येयधोरणांशी पूर्णपणे सुसंगत असेल. ट्रम्प प्रशासन आणि जनरल जॉर्ज यांच्यात लष्करी धोरणांवरून मतभेद असल्याची चर्चाही सुरू आहे.