

Donald Trump Iran warning
वॉशिंग्टन : इस्रायल आता इराणच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा 'दक्षिण पार्स' (South Pars) गॅस क्षेत्रावर आणखी कोणतेही हल्ले करणार नाही, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. १९) केली. त्याचबरोबर त्यांनी इराणला इशारा दिला आहे की, यापुढे इराणने कतारच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, "मध्यपूर्वेतील घडामोडींमुळे संतापलेल्या इस्रायलने इराणमधील 'दक्षिण पार्स गॅस फील्ड' या मोठ्या प्रकल्पावर जोरदार हल्ला केला आहे. मात्र, या विशाल प्रकल्पाचा तुलनेने छोटा भागच यात बाधित झाला आहे." दक्षिण पार्सवरील हल्ल्यापासून अमेरिकेला दूर ठेवत ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हे पूर्णपणे इस्रायलचे ऑपरेशन होते. "या विशिष्ट हल्ल्याबद्दल अमेरिकेला काहीही माहिती नव्हती. तसेच कतार या देशाचा याच्याशी कोणताही संबंध नाही, ना त्यांना या हल्ल्याची पुसटशी कल्पना होती," असे त्यांनी नमूद केले.
इराणने काल दक्षिण पार्सवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आखाती देशांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. इराणच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले होते की, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील पाच ऊर्जा प्रकल्पांना आगामी काही तासांत लक्ष्य केले जाईल.
कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे इराणने कतारमधील मुख्य नैसर्गिक वायू केंद्र असलेल्या 'रास लाफान इंडस्ट्रियल सिटी'वर (Ras Laffan Industrial City) क्षेपणास्त्र डागले. कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या ठिकाणावर युद्धादरम्यान वारंवार हल्ले झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले, "दुर्दैवाने इराणला दक्षिण पार्सवरील हल्ल्याची वस्तुस्थिती माहित नव्हती आणि त्यांनी विनाकारण कतारच्या एलएनजी (LNG) प्रकल्पावर हल्ला केला."
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तेहरानला पुढील संघर्षापासून सावध करताना धमकी दिली की, " यापुढे इराणने निर्दोष कतारवर पुन्हा हल्ला करण्याचा मूर्खपणा केला, तर अमेरिकेकडून अशा ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल. इराणने यापूर्वी कधीही पाहिले नसेल. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या मदतीशिवाय किंवा संमतीशिवाय अमेरिका संपूर्ण दक्षिण पार्स गॅस फील्ड उद्ध्वस्त करेल."