Latest

किनार्‍यावरच २०२१ मध्ये झोपले, २०२२ मध्ये उठले!

निलेश पोतदार

पणजी : पुढारी वृत्‍तसेवा

नववर्षाच्या स्वागतासाठी कळंगुटमध्ये दाखल झालेल्या देशी पर्यटकांनी 2021 च्या मध्यरात्री नशेत किनार्‍यावरच निद्रावस्था घेतली. विशेष म्हणजे या पर्यटकांना वर्ष संपल्याचे आणि नव्या वर्षाचा 2022 चा सूर्यही उगविल्याचे भान राहिले नसल्याचेच दिसून आले. विशेष म्हणजे किनार्‍यावर सकाळी वर्दळ वाढली असतानाही असे अनेक महाशय किनार्‍यावरील थंड झालेल्या वाळूत लोटांगण घेत होते.

कोरोनाचे संकट असतानाही सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांचा लोंढा प्रसिद्ध अशा कळंगूट व बागा किनार्‍याकडे वळल्याचे दिसत होते. अनेक रात्री या परिसरात चार चाकी वाहन सोडाच दुचाकी वाहन घेऊनही जाणे अशक्य असल्याचे चित्र दिसत होते. जनसागर उसळावा, अशी गर्दी कळंगुटच्या रस्त्यावर दिसत होती.

गोवा म्हटलं की खा, प्या आणि मजा करा. त्यामुळे देश-परदेशातील पर्यटकांना गोवा आपलासा वाटतो. नाताळाची सुटी व 31 डिसेंबर म्हटले की पर्यटकांना पहिल्यांदा गोवा दिसतो. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक विमान, रेल्वे, खासगी वाहने किंवा ट्रॅव्हल्सने गोव्यात दाखल होते. देशी पर्यटक गोव्यात आला की प्रथम कळंगुट किनार्‍याकडे धाव घेतो. विस्तीर्ण अशा कळंगुट किनार्‍याकडे जाण्यासाठी दुपारपासून वाहनांची गर्दी होत होती.

विशेष म्हणजे, कळंगुटकडे जाणारे म्हापसा, पर्वरी व वेरे येथील रस्त्यांवर चार चाकी वाहनांची गर्दी होती. या परिसरात शुक्रवारी रात्री जनसागर उसळावा अशी अलोट गर्दी होती. जिकडे तिकडे लोकच दिसत होते. जेवढे कळंगुटमधील रस्त्यावर होते, त्यापेक्षा अधिक लोक किनार्‍यावर होते. सायंकाळच्या सरत्या भास्कराला निरोप देण्यासाठी झालेली गर्दी किनारी भागातील पर्यटकांवर अवलंबून असलेल्या सर्व व्यावसायिकांना नक्कीच दिलासा देणारी होती.

मद्यांच्या बाटल्यांचे ढिगारे

विशेष म्हणजे, काही देशी पर्यटकांनी किनार्‍यावरच मद्याचा आनंद लुटत सरत्या वर्षाला निरोप तर दिलाच. परंतु हे पर्यटक मद्य किंवा बिअर घेतल्या त्याच ठिकाणी लुडकले. त्यामुळे 2021 मध्ये झोपलेल्यांना 2022 मध्ये सूर्योदय होऊन दोन-तीन तास उलटले तरी त्यांना जाग येण्याचा पत्ता दिसत नव्हता. काहीजण तर केवळ अंडरवेअरवर झोपलेले आढळून आले. याशिवाय किनार्‍यावर दारूच्या, बिअरच्या बाटल्यांचे ढिगारे दिसून येत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT