Raut Vs Modi : “उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये भाजपची घसगुंडीच होईल”

संजय राऊत
संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : "२०२१ साल सरले, पण २०२२ या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी १२ कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली आहे. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे", असा मिश्किल टोमणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या 'रोखठोक'मधून लगावला आहे. (Raut Vs Modi)

प्रधान सेवकांनी फकीर असल्याचा पुनरुच्चार करू नये

"मावळते वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे. २८ डिसेंबरल रोजी देशभरातील माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या १२ कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वैगेरे महत्वाच्या, पण त्यापुढे फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये", अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. (Raut Vs Modi)

उत्तरखंड, उत्तरप्रदेश राज्यात भाजपची घसरगुंडीच होईल

"मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आता असे वाटू लागले आहे की, त्यांचा पक्ष सत्तेवरून कधीच खाली उतरणार नाही. तो भ्रम आहे. प. बंगालात भाजपचा दारूण पराभव झाला. नरेंद्र मोदगी यांचा चेहरा व अमित शहा यांची दबंग चाणक्य निती सर्वत्र चालतेच असे नाही, हे प. बंगालने सिद्ध केले आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काल भाजपचा पराभव झाला. चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा टक्का घसरला. तेथे 'आप'सारख्या पक्षाने बाजी मारली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात नव्या वर्षात विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेथेही घसरगुंडीच होईल, असे स्पष्ट दिसते. २०१४ साली सुरु झालेल्या भाजपच्या प्रवासाचा आलेख २०२२ मध्ये खाली आलेला दिसेल, इतका रोष जनतेच्या मनात आहे", अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

लोकांना एकच विनंती, २०२२ मध्ये तरी शहाणे व्हा!

"पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार १२ कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे 'दर्शन' पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. २०२२ सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे," असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news