पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची सर्वत्र चर्चा आहे. या नव्या व्हेरियंटबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर सध्या असणार्या कोरोना प्रतिबंधक लस ( COVID Vaccine ) कितपत प्रभावी ठरणार यावरही चर्चा सुरु आहे. आता यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने ('डब्ल्युएचओ) दिलासादायक माहिती दिली आहे.
'डब्ल्युएचओ'च्या वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा नवा व्हिरियंट हा मागील व्हिरियंटच्या तुलनेत कमी घातक आहे. ज्यांनी कोरोनाच्या दोन लस ( COVID Vaccine ) घेतल्या आहेत. त्यांच्यावर याचा प्रभाव कमी असेल. कोरोना प्रतिबंधक लस या ओमायक्रॉनवर प्रभावी ठरु शकतात. सध्या तरी या नव्या व्हेरियंटबाबत खूप काही माहिती नाही; पण सुरुवातीच्या संशोधनामध्ये ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी धोकादायक असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ अँथनी फॅसी यांनी म्हटलं आहे की, डेल्टा व्हेरियंटपेक्षाही ओमायक्रॉनचा फैलाव हा अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र डेल्टा व्हिरियंट एवढा ओमायक्रॉन घातक नाही. प्रारंभीच्या संशोधनात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांना साैम्य लक्षणं आढळली आहेत. या नव्या व्हेरियंटच्या दुष्परिणामाची माहिती मिळण्यासाठी काही दिवस जावे लागले, असेही त्यांनी सांगितले.
ओमायक्रॉनसंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान बोसिर जॉनसन यांनी असा दावा केला आहे की, प्रारंभीच्या संशोधनात ओमायक्रॉनचा फैलाव हा डेल्टापेक्षा अधिक आहे. मात्र सध्या तरी याबाबत अपुरी माहिती असल्याने कोणतेही भाष्य करता येणार नाही. अंतिम माहितीनंतरच याबाबत निष्कर्ष काढता येईल.
हेही वाचलं का?