South Africa Tour : अजिंक्य रहाणे राहणार की जाणार? | पुढारी

South Africa Tour : अजिंक्य रहाणे राहणार की जाणार?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची कामगिरी ही गेल्या एक वर्षापासून म्हणावी तशी राहिलेली नाही. त्याने 2021 मध्ये 12 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 19.75 च्या सरासरीने 411 धावा केल्या. त्याला दुखापत झाल्याने न्यूझीलंड विरुद्ध शेवटच्या कसोटीत तो सहभागी झाला नव्हता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर (South Africa Tour) तो जाणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

दक्षिण आफ्रिकेत रहाणेची चांगली कामगिरी (South Africa Tour)

अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेत तीन कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 266 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 53.20 अशी आहे. तीन कसोटीत या खेळाडूने दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामधील सर्वाधिक धावा 96 होत्या. एकूण दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कामगिरी पाहिल्यास रहाणेने एकूण 10 कसोटी सामन्यांत 57.33 च्या सरासरीने 748 धावा केल्या आहेत. रहाणेने यामध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

विराट कोहलीने दिला पाठिंबा (South Africa Tour)

न्यूझीलंड विरुद्ध मुंबई कसोटीत विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने अजिंक्य रहाणेला पाठिंबा दिला आहे. कोहली म्हणाला की, आम्ही अशा लोकांमधील नाही जे सुरुवातीला गुणगान करतात आणि नंतर संघातून वगळण्यास सांगतात. रहाणेने संघासाठी निर्णायक लढतीत चांगली कामगिरी केली आहे आणि त्याला सर्वांचा पाठिंबा मिळालाच पाहिजे.

विदेशातील खेळपट्टीवर रहाणेने दाखवली चमक 

अजिंक्य रहाणेने भारतात 32 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 35.73 च्या सरासरीने 1,644 धावा केल्या आहेत. मात्र, विदेशात त्याची कामगिरी चांगली आहे. रहाणेने भारताबाहेर 46 कसोटी सामने खेळले असून, 41.71 च्या सरासरीने 3,087 धावा केल्या आहेत. रहाणेने भारतात केवळ चार शतके झळकावली तर, विदेशात त्याच्या नावे 8 शतके आहेत. विदेशी खेळपट्टीवर रहाणेने तेथील गोलंदाजांविरुद्ध नेहमी चांगला खेळ केला आहे.

Back to top button