हापसा; पुढारी वृत्तसेवा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी कैदी गजेंद्र सिंग (छोटू) याच्यावर दुसर्या कैद्याने हल्ला केला. यात छोटू याच्या उजव्या गालाला दुखापत झाली. हे दोन्ही कैदी अंडरट्रायल आहेत. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने कोलवाळ पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. हल्लेखोर अझीझ आसिफ असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
जिन्यावरून चढताना कैद्यावर हल्ला केल्याने त्याच्या उजव्या गालास दुखापत झाली. यावेळी तुरुंग कर्मचार्यांनी दोघांनाही ताबडतोब वेगळे केले. ही जखम गंभीर नाही. घटनेनंतर तत्काळ जखमी कैद्यास उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारानंतर पुन्हा कारागृहात पाठवले.
संशयितास तुरुंगाच्या नियमांनुसार शिक्षा म्हणून एक महिन्यासाठी आयसोलेशन ब्लॉकमध्ये पाठविल्याची माहिती एका वरिष्ठ कारागृह अधिकार्याने दिली. गजेंद्र सिंग (छोटू) याला दोन महिन्यांपूर्वी सौझा लोबो रेस्टॉरंटवरील हल्ला प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्यास कोलवाळ कारागृहात ठेवले आहे.
याप्रकरणी तुरुंग अधीक्षक वासुदेव शेट्ये यांनी कोलवाळ पोलिसात तक्रार दिली असून उपनिरीक्षक सुशांत सांगावकर तपास करीत आहेत. कैदी अझीझ हा सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध गोव्यासह कर्नाटक व इतर राज्यांत गुन्हे नोंद आहे. या हल्ल्यासाठी वापरलेले ब्लेडसारखे हत्यार हे पाण्याच्या स्टील जगच्या हॅण्डलपासून बनविले होते. हे हॅण्डल तोडून ते भिंतीवर घासून ते धारदार केले होते.
हेही वाचलंत का?