नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात एक जानेवारी ते 28 फेब—ुवारी या कालावधीत चोरट्यांनी सात लाख 25 हजार 701 रुपयांचा ऐवज हिसकावून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापैकी मोजकेच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांनी 12 गुन्ह्यांमध्ये 23 तोळे वजनाचे दागिने व पाच गुन्ह्यांमध्ये 41 हजार 700 रुपयांचे मोबाइल व रोकड हिसकावून नेल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
सोमवारी (दि.28) शहरातील नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन ओरबाडून नेली. तर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतही दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची पोत ओरबाडून पळ काढल्याची घटना घडली. एकाच दिवशी ठराविक अंतराने दोन घटना घडल्याने सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाल्याची शंका उपस्थित होत आहे. चालू वर्षात दोन महिन्यांत 16 घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज ओरबाडून नेला आहे.
मुंबईनाका येथील एका घटनेत अल्पवयीन मुलाने शेजारील महिलेच्या घरात शिरून तिला गंभीर जखमी करून तिच्याकडील महागडे दागिने ओरबाडून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतरही अनेक दुचाकीस्वार चोरट्यांनी दमदाटी करून किंवा काही क्षणात मोबाइल, दागिने, रोकड हिसकावून नेल्याचे प्रकार घडले आहेत. यातील मोजकेच गुन्हे उघडकीस आले आहेत. मागील वर्षभरात इतर जबरी चोर्यांप्रकरणी 98 गुन्हे दाखल होते. त्यापैकी 67 गुन्ह्यांची उकल करण्यात आली. तर 65 गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी दागिने ओरबाडून नेले आहेत. त्यापैकी 22 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींनी ज्या सराफ व्यावसायिकांना सोने विकले त्यांनाही पोलिसांनी आरोपी केल्याने चोरीचे दागिने विक्रीसाठी चोरट्यांना बरीच कसरत करावी लागत असल्याचे बोलले जात आहे.