Russia-Ukraine War : 'आमचे सैन्य युक्रेनमध्ये जाऊन लढणार नाही पण आम्ही युक्रेनसोबत' | पुढारी

Russia-Ukraine War : 'आमचे सैन्य युक्रेनमध्ये जाऊन लढणार नाही पण आम्ही युक्रेनसोबत'

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन याच्यांत मागच्या ६ दिवसांपासून लष्करी कारवाई सुरू आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये एकवेळा चर्चाही झाली. परंतु या चर्चेतून काहीच साध्य न झाल्याने रशियाने कारवाई पुन्हा सुरू ठेवली. युक्रेनच्या कित्येक शहरांवर रशियाने हल्ला चढवला आहे. काल एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रशियाने युक्रेनच्या महत्वाच्या शहरांवर हल्ले केल्याने १ हजारांवर नागरीकांना जीव गमवावा लागला. (Russia-Ukraine War)

दरम्यान अमेरीकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी स्टेट ऑफ युनियनमध्ये संबोधित करताना रशियावर ताशेरे ओढले. त्यांनी रशियाची सर्वच बाजूंनी कोंडी करण्यासंबंधी वक्तव्य केले आहे. बायडेन पुढे म्हणाले की, आम्ही युक्रेनसोबत आहे. रशियाची नाकेबंदी करण्यासाठी आम्ही मित्र देश मिळून प्रयत्न करत आहोत.

Russia-Ukraine War : अमेरिका रशियाची हवाई हद्द बंद करणार

आम्ही रशियाची आर्थीक कोंडी करण्यासाठी त्यांच्या मोठ्या बँकांना आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणाली व्यवस्थेतून काढून टाकण्याचा निर्णय घेणार आहोत. याचबरोबर अमेरिका आपली हवाई हद्द रशियाच्या सर्व विमानांसाठी बंद करणार असल्याचे बायडेन म्हणाले.

रशियाला वाटत होते युक्रेन आपल्यापुढे नाक घासेल पण युक्रेनने रशियाला चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्या संपूर्ण इतिहासात आपण हा धडा शिकलो आहोत हुकुमशहा आपल्या अस्तित्वासाठी अराजकता निर्माण करतात. अमेरिका युक्रेनच्या लोकांसोबत आहे. या हल्ल्याची किंमत रशियाला चुकवावी लागेल, असा इशाराही बायडेन यांनी पुतीन यांना दिला. बिडेन यांच्या भाषणावेळी युक्रेनचे राजदूतही उपस्थित होते.

अमेरिका जशासं तसं उत्तर देणार

बायडेन पुढे म्हणाले की अमेरिकन सैन्य रशियन लष्कराविरोधात थेट लढणार नाही, पण अमेरिका रशियाला मनमानी कारभार करण्यापासून नक्कीच रोखेल असे ते म्हणाले. रशियन लष्कर पश्चिमेकडे चाल करुन आलं तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराच बायडेन यांनी दिला.

अमेरिका आणि नाटो देश युक्रेनला १ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत करणार असल्याचे बायडेन म्हणाले. आमचे सैन्य युक्रेनमध्ये प्रत्यक्ष युद्धात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही. मात्र इतर मार्गांनी आम्ही युक्रेनला शक्य ती सर्व मदत करणार आहोत. रशियापासून धोका असू शकतो अशी शक्यता असणाऱ्या भागांमध्ये नाटोच्या सैन्याला तैनात करण्यात आल्याचे बायडेन म्हणाले.

Back to top button