Goa Night Club Fire: गोवा नाईट क्लब अग्निकांडात २५ लोकांचा जीव गेला होता. त्यानंतर Birch by Romeo Lane नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुखरा हे थालंडला पळून गेला होता. त्याला तिथ अटक झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांनी सांगितले की या दोघा लुथरा बंधूंना भारतात परत आणण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाला गोवा सरकारनं या प्रकरणात मदत करण्याची विनंती केली होती. सरकारनं गौरव आणि सौरभ लुथरा यांचा पासपोर्ट रद्द केला होता. ६ डिसेंबरला ज्या दिवशी या नाईट क्लबला आग लागली त्यानंतर थोड्याच वेळात लुथरा बंधू हे भारतातून पळून गेले होते. त्यानंतर त्यांच्याविरूद्ध सीबीआयकडून ब्लू कॉलर नोटीस बजावण्यात आली होती.
दरम्यान, Birch by Romeo Lane नाईट क्लब अग्नितांडवाचा तपास करत असताना गोवा पोलिसांना क्लब मालक यांनी इकडं आपत्कालीन टीम आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धावपळ करत असताना त्याच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास थायलंडच्या विमानाची तिकीटे बूक केल्याचं आढळून आलं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव आणि सौरभ यांनी मेक माय ट्रिपवरून ७ डिसेंबरच्या पहाटे १.१७ मिनिटांनी तिकीट बूक केलं. त्यावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. बचाव कार्य असून सुरू होतं. त्यावेळीच लुथरा बंधू हे देश सोडून पळून जाण्याची तयारी करत होते.
दरम्यान, बुधवारी नवी दिल्ली कोर्टानं या लुथरा बंधूंना अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावेळी त्यांच्या वकिलांनी लुथरा बंधू हे देश सोडून पळून जाणार नाहीत असा युक्तीवाद केला होता. ते व्यावसायिक ट्रिपवर आहेत असा दावा देखील त्यांच्या वकिलांनी केला होता. याचबरोबर कोर्टात हे दोघे क्लबचे मालक नसून त्यांच्या नावावर नाईट क्लबचे लायसन्स आहे असा देखील दावा करण्यात आला.
गोवा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच नाईट क्लब मॅनेजर्स आणि स्टाफ मेंबर्सना अटक केली आहे. दरम्यान, लुथरा बंधूंच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी भारतीय अधिकारी थायलंडच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्दैवी घटनेच्या तपासाचा अहवाल हा आठ दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याने या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या लोकांना नुकसान भरपाई देण्यास सुरूवात केली आहे.