

पणजी : मृतदेह नेपाळला न्यायचे कसे, असा प्रश्न हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या क्लबला लागलेल्या आगीमुळे जीव गमावलेल्या मृताच्या मित्रांसमोर उभा ठाकला आहे.
नेपाळ येथील जनक गुजर याच क्लबच्या वागातोर येथील दुसर्या शाखेत काम करतात. ते 2021 पासून गोव्यात आहेत. या क्लबच्या पाच शाखा आहेत. हडफडे येथील क्लब एक - दीड वर्षापूर्वी सुरू झाला होता, असे जनक यांनी सांगितले. या क्लबमधील किचनमध्ये नेपाळ, झारखंड, उत्तराखंड येथील तरुण शेफ म्हणून काम करत होते. शनिवारी रात्रीच्या दुर्घटनेत सुमारे 14 शेफ मृत्युमुखी पडले. ते सर्वजण खालच्या भागात किचनमध्ये होते. वरच्या भागातील व्यवस्थापक वगैरे अनेकजण बाहेर जाऊ शकले. मात्र, किचनमधील कर्मचार्यांना आग लागल्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी शक्यताही जनक यांनी व्यक्त केली.
मला ही माहिती समजल्यावर मी आणि माझा भाऊ व इतर मित्र जीएमसीमध्ये ओळख पटवण्यासाठी आलो होतो. ओळख पटवल्यावर पोलिस, आरोग्य अधिकारी मृतदेह गावी घेऊन चला, असे म्हणतात. आम्ही मृतदेह इतक्या लांब कसे न्यायचे? सध्या मृतदेहांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. ते उघड्यावर ठेवले आहेत. काही काळाने त्यांना दुर्गंधी सुटू शकते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह शवागरात सुरक्षितपणे जतन करून ठेवावेत, अशी आमची मागणी आहे, असे सांगून जनक म्हणाले, या मृतदेहांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था संबंधित क्लब कंपनीने करावी. आम्ही 20-25 हजार रुपये पगार घेणारे कामगार. इतक्या लांब विमानाने जायचे, तर एक दिवस आणि हजारो रुपये लागणार, ते आम्ही कुठून आणायचे? माझा मित्र मृत्युमुखी पडला, त्याच्या मागे पत्नी, आई, मुलगा आहे. त्यांना आता आधार कुणाचा याचा विचारही कंपनीने करावा. सरकारी मदत मिळाली तरी ती अपुरी पडणार, असेही त्यांनी सांगितले.
कुटुंबीयांना माहिती द्यायला हवी होती
क्लबमध्ये नोकरीवर घेताना कर्मचारी आणि कर्मचार्यांच्या कुटुंबीयांची सर्व ओळखपत्रे, मोबाईल नंबर घेतले जातात. मात्र, कित्येक तास उलटले, तरी त्यांना दुर्घटनेबाबत माहिती देण्यात आली नव्हती, असेही जनक यांनी सांगितले.
दैव बलवत्तर म्हणून...
आपल्या भावाला शेफ म्हणून जॉब मिळाला होता, त्याला तसे पत्रही मिळाले होते. तो याच क्लबमध्ये हजर होणार होता. त्याचे दैव बलवत्तर म्हणून त्याने आज, रविवारी हजर होण्याचा निर्णय घेतला; अन्यथा अनर्थ घडला असता, असे जनक यांनी सांगितले.