

गोव्यातील बेकायदेशीर नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत विषारी धुरामुळे २५ जणांचा मृत्यू झाला, त्यात २० कर्मचारी आणि ५ पर्यटकांचा समावेश.
क्लबमध्ये फायर सेफ्टी, एक्झिट फलक, अलार्म, वायुवीजन यासह कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती.
चौकशीनंतर तीन अधिकारी निलंबित, तर क्लबचे व्यवस्थापक आणि सरव्यवस्थापकाला अटक; ६ दिवसांची पोलिस कोठडी.
शॉर्टसर्किट किंवा आत्यषबाजीमधील ठिणगीमुळे आग लागल्याची शक्यता; प्रशासनाच्या ढिसाळ व निष्काळजी भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह.
पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील रोमियो लेन क्लबमध्ये झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल गोवा सरकारने घेतली आहे. गोवा राज्य हे पर्यटन राज्य असल्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी किनारी भागातील बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली असून लुथरा बंधूंच्या क्लबचे अतिक्रमण पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
लुथरा बंधू विदेशात पळाले असले तरी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या एजन्सींशी संपर्क ठेवून तपास सुरू केला आहे आणि लवकरच ते जेरबंद होतील, असे स्पष्ट निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू, पोलिस प्रमुख यांच्यासह पर्यटन उद्योगातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतले.
या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा पुरवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. घडलेली घटना दुर्दैवी आहे; मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गोवा सरकार सतर्क झाले आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपास समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर जी नियमबाह्य आणि बेकायदेशीर बांधकामे आहेत ती पाडली जातील. कोणाचाही मुलाहिजा पाळला जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्याचबरोबर राज्यातील विविध पर्यटन व्यवसाय व उद्योगांच्या तपासणीसाठी खास सुरक्षा समिती नेमण्यात आलेली असून त्यामध्ये महसूल सचिव, पोलीस महानिरीक्षक, अर्थ संयुक्त सचिव आणि अग्निशमन दलाच्या संचालकांचा समावेश आहे. ही समिती कॅसिनोसह राज्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेची तपासणी करेल. आतापर्यंत रोमियो लेन क्लबमध्ये झालेल्या अग्नीकांड प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सर्व खात्यांना सतर्क करण्यात आले असून विविध पर्यटन व्यवसायांचे परवाने तपासण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे योग्य परवाने नाहीत त्यांच्यावर कारवाई करताना बेकायदेशीर बांधकामे त्वरित पाडण्याची कारवाई सुरू होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी घडलेल्या दुर्घटनेची दखल घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. पर्यटकांच्या सुरक्षेवर भर दिला जात आहे. बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू झाली आहे. पॅराग्लायडिंगसारख्या उपक्रमांसाठी कडक नियम करण्यात आले असून गोवा पर्यटनासाठी सुरक्षित आहे, असे खंवटे यांनी सांगितले.
क्लब जळीतकांड प्रकरणी निलंबित करण्यात आलेले अधिकारी चौकशीला आले नाहीत तर त्यांना अटक होऊ शकते, असे मुख्यमंत्री एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.
रोमियो लेन क्लबचे मालक लुथरा बंधूंनी परदेशात फरार झाल्यानंतर नवी दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.