AI Human Brain Study  AI-generated image
आर्टिफिशियल इंटेलिजन्स

AI Human Brain Study : 'एआय' मानवी मेंदूसारखे काम करत नाही; नव्या संशोधनात नेमकं कोणती माहिती समोर आली?

मेंदूतील हालचालींवरून एआयच्या आत नेमके काय चालले आहे याची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

AI Human Brain Study : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली मानवी मेंदूप्रमाणेच कार्य करते, असा शास्त्रज्ञांचा आजवरचा समज होता. मात्र, यॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासातून या दाव्यातील फोलपणा समोर आला आहे. एआय मॉडेल्स मेंदूच्या कार्याची नक्कल करू शकतात, पण त्यांची माहिती प्रक्रिया करण्याची पद्धत मानवी मेंदूपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. 'नेचर मशीन इंटेलिजन्स' (Nature Machine Intelligence) या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

संशोधकांनी कोणता प्रश्‍न उपस्‍थित केला?

गेल्या दशकापासून मानवी दृष्टी आणि मेंदू दृश्यांचे आकलन कसे करतो, हे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ 'आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स' (ANNs) या संगणकीय प्रणालींचा आधार घेत आहेत. हे एआय मॉडेल्स मेंदूच्या हालचालींची हुबेहूब नक्कल करत असल्याने न्यूरोसायन्समध्ये (मेंदूविज्ञान) त्यांचे मोठे महत्त्व होते. मात्र, केवळ एखादी एआय प्रणाली मेंदूच्या प्रतिसादाची नक्कल करू शकते, याचा अर्थ ती मेंदूप्रमाणेच विचार करते असा होत नाही, असा महत्त्वाचा प्रश्न या संशोधनाने उपस्थित केला आहे.

आजवरची तपासणी केवळ एकाच बाजूने

यॉर्क विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक कोहितीज कर यांनी म्‍हटलं आहे की, "वस्तू ओळखण्यासाठी मेंदूच्या ज्‍या भागात हालचाली होतात, त्याचा अचूक अंदाज एआय बांधू शकते. त्यामुळेच एआयला 'मेंदूसारखे' म्हटले जाते; पण आजवर ही तपासणी केवळ एकाच बाजूने केली जात होती."

उलट्या दिशेने केलेली चाचणी आणि धक्कादायक निष्कर्ष

यॉर्क विद्यापीठाच्या टीमने तपासणी उलट्या दिशेने करण्याचे ठरवले. एआय मेंदूच्या पेशींचा किती अचूक अंदाज बांधते हे पाहण्याऐवजी, मेंदूतील हालचालींवरून एआयच्या आत नेमके काय चालले आहे? याचा अंदाज बांधता येतो का? हे त्यांनी तपासले. एआय खरोखरच मेंदूसारखे काम करत असेल, तर हा संबंध दोन्ही बाजूंनी सारखाच असायला हवा, असा संशोधकांचा तर्क होता. यासाठी त्यांनी 'रिव्हर्स प्रेडिक्टिव्हिटी टेस्टिंग' ही नवी पद्धत विकसित केली. या प्रयोगासाठी संशोधकांनी अस्वल, हत्ती, मानवी चेहरा, सफरचंद, कार, कुत्रा, खुर्ची, विमान, पक्षी आणि झेब्रा या १० परिचित विषयांची १,३२० नैसर्गिक छायाचित्रे वापरली. याशिवाय या वस्तूंची रेखाचित्रे आणि कलात्मक रूपे असलेली ३०० अतिरिक्त चित्रेही तपासणीसाठी घेण्यात आली.

मेंदू आणि एआयच्या कार्यपद्धतीत मोठी दरी

चाचणीचे निकाल आश्चर्यकारक होते. एआय मॉडेल्स मेंदूतील न्यूरॉन्सच्या (माहिती वहन करणाऱ्या पेशी) प्रतिसादाचा अचूक अंदाज बांधू शकले. परंतु, जेव्हा ही प्रक्रिया उलट केली गेली, तेव्हा मेंदूतील न्यूरॉन्स एआय मॉडेलच्या अंतर्गत वैशिष्ट्यांचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरले. विशेष म्हणजे, दोन वेगवेगळ्या मानवी मेंदूंची जेव्हा अशी तुलना केली गेली, तेव्हा ही अडचण आली नाही.

...तर भविष्यात एआय आणि मानवी मेंदू यांतील दरी आणखी वाढत जाईल

प्रा. कर यांच्या मते, "आजच्या एआय प्रणाली दृश्ये ओळखण्यासाठी अशा काही अंतर्गत क्लृप्त्या वापरतात, ज्यांचा वापर मानवी मेंदू करत नाही. वरवर पाहता परिणाम सारखे दिसत असले तरी दोघांची मूळ कार्यपद्धती भिन्न आहे. शास्त्रज्ञांनी केवळ वरवरच्या अचूकतेवर विसंबून एआय मॉडेल्स विकसित करणे सुरू ठेवले, तर भविष्यात एआय आणि मानवी मेंदू यांतील दरी आणखी वाढत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मानवी वर्तन आणि वैद्यकीय संशोधनावर होणारा परिणाम

या संशोधनाचे पडसाद केवळ संगणक क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत. सध्या मानवी वर्तन, मानसिक आजार, श्रवणशक्ती आणि भाषा यांसारख्या विषयांच्या अभ्यासासाठी एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सध्याचे एआय मॉडेल्स मानवी मेंदूशी किती मिळतेजुळते आहेत, यावर आमच्या संशोधनाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे, असे या टीममधील पोस्टडॉक्टरल फेलो सबिना मुझेलॅक यांनी स्पष्ट केले. सध्याच्या एआय मॉडेल्सवर पूर्णपणे विसंबून मानवी वर्तनाचे किंवा वैद्यकीय संशोधनाचे निष्कर्ष काढणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे संशोधकांनी या मॉडेल्सचा वापर करताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

संशोधनचा फायदा काय?

या संशोधनाचा उद्देश एआयचा वापर थांबवणे हा नसून, त्यांना अधिक विश्वासार्ह बनवणे हा आहे. एआय मॉडेलमधील नेमके कोणते घटक मानवी मेंदूशी सुसंगत आहेत, हे ओळखून त्यावर अधिक काम करता येणार आहे. आमच्या या पद्धतीमुळे एआयचा नेमका कोणता भाग मेंदूच्या कार्याशी जुळतो हे समजण्यास मदत होईल. ऑटिझम (स्वमग्नता) यांसारख्या विकारांवर संशोधन करण्यासाठी सर्वसामान्य मेंदूची अचूक कार्यपद्धती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, तिथे याचा मोठा फायदा होईल," असे प्रा. कर यांनी नमूद केले. जगभरातील एआय डेव्हलपर्सना आपल्या प्रणालींची तपासणी करता यावी, यासाठी या संशोधकांनी एक 'टेस्टिंग टूलकिट' देखील खुले केले आहे. यामुळे भविष्यात मानवी मेंदूच्या अधिक जवळ जाणारी आणि अधिक अचूक एआय प्रणाली विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT