

चीनमधील कंपनीने विकसित केलेल्या उपकरणात स्वयंचलित गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
AI laser mosquito killer device : जगभरात डास केवळ उपद्रव नसून आरोग्यासाठीची एक गंभीर समस्या आहे. मलेरिया, डेंग्यू, झिका आणि चिकुनगुनिया यांसारखे डासांमार्फत पसरणारे आजार दरवर्षी कोट्यवधी लोकांना बाधित करतात. डासांना प्रतिबंध करण्यासाठी आजवर अनेक उपायही करण्यात आले आहेत. मात्र, आता चीनमधील एका स्टार्टअप कंपनीने बुद्धिमत्ता (AI) आणि लेझरचा वापर करून डासांचा हवेतच खात्मा करणारे उपकरण तयार केले आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांचे हे उपकरण लेझर तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून डासांची ओळख पटवते आणि त्यांना हवेतच लक्ष्य करते.
चीनमधील 'फोटॉन मॅट्रिक्स' (Photon Matrix) या कंपनीने हे उपकरण विकसित केले आहे. स्वयंचलित गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. हे उपकरण डासांची ओळख पटवते आणि त्यांचा मागोवा घेते. यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेराही बसवलेला आहे. लेझरचा मारा चुकूनही एखाद्या व्यक्तीवर किंवा प्राण्यावर होऊ नये, यासाठी कॅमेरा परिसराचे विश्लेषण करतो.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, डासांचा हवेतच खात्मा करणारे हे लेझर मानवी डोळ्यांवर पडला, तर त्यामुळे इजा होऊ शकते. सुमारे १,००० डॉलर्स किमतीचे (सुमारे ८५,००० रुपये) हे उपकरण डासांचे पंख जाळून टाकते. यामुळे डास निकामी होऊन जमिनीवर पडतात.
पारंपरिक इलेक्ट्रिक इन्सेक्ट किलर्स, कॉइल्स किंवा रासायनिक फवारण्यांच्या तुलनेत, हे उपकरण कोणत्याही कीटकनाशकांचा वापर न करता काम करते. हे उपकरण आकाराने लहान असल्याने घरामध्ये, हॉटेल्स किंवा इतर व्यावसायिक ठिकाणी, तसेच घराबाहेरही वापरले जाऊ शकते. ग्लोबल साउथ-ईस्ट आशियातील अनेक देशांनी डास नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. उदाहरणार्थ, सिंगापूरने डासांची संख्या कमी करण्यासाठी 'निर्बीज नर डासांचा' वापर केला आहे. यासोबतच तिथे जनजागृती मोहिमा आणि पारंपरिक कीटक नियंत्रण उपायही राबवले जातात.
या लेझर प्रणालीची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध झाली, तर ती डास नियंत्रणाचा एक नवा पर्याय ठरू शकते. मात्र, हे उपकरण डासांना इतर कीटक किती अचूकपणे वेगळे ओळखू शकते आणि मानवांच्या, पक्ष्यांच्या किंवा मधमाश्यांसारख्या उपयुक्त कीटकांच्या उपस्थितीत हे लेझर किती सुरक्षितपणे काम करू शकते, असे प्रश्न अजूनही कायम आहेत.
नवीन उपकरणामुळे डासां खात्मा होत असला तरी संगणकांना मानवी हस्तक्षेपाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने लेझर वापरण्याची मुभा देण्याबाबत काही चिंताही व्यक्त केल्या जात आहेत.
'फोटॉन मॅट्रिक्स लॅब'चे संस्थापक आणि सीईओ वांग चुआन यांनी सांगितले की, स्वतःला होणाऱ्या डासांच्या दंशांमुळे त्रस्त होऊन त्यांनी ही प्रणाली विकसित केली. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी औद्योगिक लेझर तंत्रज्ञान आणि एआय अल्गोरिदम यांचा मेळ घालून हे छोटे, ग्राहकांसाठी उपयुक्त असे उपकरण तयार केले आहे.
नवीन तंत्रज्ञान केवळ डासांचा त्रास असलेल्या प्रदेशांतच नव्हे, तर इतर ठिकाणीही मोठी बाजारपेठ मिळवू शकते. हवामानातील बदलांमुळे आता अशा भागांतही डासांची संख्या वाढू लागली आहे, पूर्वी ही समस्या फारशी जाणवत नव्हती. सध्या तरी, हे तंत्रज्ञान डास नियंत्रणाच्या प्रस्थापित पद्धतींना पूर्णपणे बदलण्याऐवजी एक नवा पर्याय म्हणून समोर आले आहे. याचा व्यापक वापर हा प्रत्यक्ष परिस्थितीतील कामगिरी, सुरक्षा चाचण्या, किंमत आणि विविध वातावरणात हे उपकरण किती प्रभावीपणे काम करते, यावर अवलंबून असेल.