Leftover Tea Leaves Uses pudhari
फीचर्स

Leftover Tea Leaves Uses: फेकून देऊ नका उरलेली चहाची पूड! घर स्वच्छ ठेवण्यापासून झाडांसाठी खतापर्यंत 'हे' आहेत ५ भन्नाट उपयोग

Anirudha Sankpal

Leftover Tea Leaves Uses: आपल्या घरात दिवसाची सुरुवात बहुतेक वेळा गरमागरम चहाच्या कपानेच होते. मात्र चहा बनवल्यानंतर उरलेली चहाची पूड आपण निरुपयोगी समजून सरळ कचर्‍यात टाकतो. प्रत्यक्षात हीच चहाची पूड घरातील अनेक कामांसाठी उपयुक्त ठरू शकते. काच स्वच्छ करण्यापासून ते झाडांसाठी सेंद्रिय खत तयार करण्यापर्यंत तिचे अनेक फायदे आहेत. योग्य पद्धतीने वापरल्यास उरलेली चहाची पूड घरगुती स्वच्छतेसाठी नैसर्गिक क्लिनर म्हणूनही उपयोगी पडते.

काचेच्या खिडक्या चमकवा

घरातील काचेच्या खिडक्या, आरसे किंवा काचेचे टेबल डागाळले असतील तर वापरलेली चहाची पूड पुन्हा पाण्यात उकळा. हे पाणी थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत भरून किंवा स्वच्छ कापडाने काचेवर लावा. त्यानंतर कोरड्या कापडाने किंवा वर्तमानपत्राने पुसल्यास काच स्वच्छ आणि चमकदार दिसते.

भांड्यावरील काळे डाग घालवण्यासाठी

स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांच्या तळाशी चिकटलेली काळी घाण आणि तेलकटपणा काढण्यासाठी चहाची पूड आधी स्वच्छ पाण्याने धुवा. त्यात थोडासा भांडी धुण्याचा साबण मिसळून भांड्यांवर घासल्यास ती अधिक स्वच्छ होण्यास मदत होते.

लाकडी फर्निचर चकाचक करण्यासाठी

जुने लाकडी टेबल, दरवाजे किंवा फर्निचर निस्तेज दिसत असेल तर चहाची पूड पाण्यात उकळून ते पाणी थंड करा. त्यात मऊ कापड भिजवून पिळून फर्निचर पुसा. त्यामुळे फर्निचरवरील धूळ निघून ते अधिक तजेलदार दिसू शकते.

सेंद्रिय खत

चहाच्या पूडमध्ये काही पोषक घटक असतात. वापरलेली चहाची पूड प्रथम स्वच्छ धुवून त्यातील दूध आणि साखरेचे अंश काढून टाका. त्यानंतर ती वाळवून कुंड्यांतील मातीत मिसळा. यामुळे मातीतील सेंद्रिय घटक वाढण्यास मदत होऊ शकते.

डास आणि माशा दूर ठेवण्यासाठी

धुवून वाळवलेली चहाची पूड काहीजण घरात धूर करण्यासाठी वापरतात. या धुरामुळे डास आणि काही लहान कीटक दूर राहण्यास मदत होऊ शकते. मात्र हा उपाय करताना घरात पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्या.

चहाची पूड वापरण्यापूर्वी ही काळजी घ्या

चहाची पूड पुन्हा वापरण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने चांगली धुणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यातील दूध आणि साखरेचे अवशेष निघून जातात. अन्यथा मुंग्या किंवा इतर कीटक आकर्षित होऊ शकतात. तसेच घरातील नाजूक पृष्ठभागांवर वापरण्यापूर्वी छोट्या भागावर चाचणी करून पाहणे योग्य ठरेल.

रोज कचर्‍यात जाणारी उरलेली चहाची पूड योग्य पद्धतीने वापरल्यास घरातील स्वच्छता, फर्निचरची देखभाल आणि बागकामासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी चहा बनवल्यानंतर चहाची पत्ती फेकण्याऐवजी तिचा असा पुनर्वापर करून पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT