Relationship Tips
मैत्री, प्रेम आणि अतूट विश्वास अशी पती आणि पत्नीच्या नात्याची ओळख आहे. या दोघांपैकी एकाचा जरी तोल गेला तर संसाराच्या सुखकर प्रवासाला ब्रेक लागण्याची भीती असते. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनात हे नातं अधिक दृढ करण्यासाठी दिवसाची सुरुवात खूपच महत्त्वाची ठरते. सकाळचा वेळ जाणीवपूर्वक एकमेकांसाठी देणार्या दाम्पत्याचे नाते अधिक आनंदी असते, असे मानसशास्त्र सांगते. मात्र बहुतांश जण सकाळच्या वेळेला फारसं महत्त्व देत नाहीत. जाणून घेऊया ,आनंदी दाम्पत्य जीवनासाठीच्या दिवसाची सुरुवात कशी करावी याबाबतच्या टीप्स...
आजकालच्या धावपळीच्या जगात पती-पत्नीसाठी सकाळ म्हणजे फक्त कामाची घाई असते. अलार्म वाजला की फोन बघणे, घाईघाईत चहा-कॉफी पिणे आणि नीट बोलण्याआधीच आपापल्या कामाला निघून जाणे, असंच साधारण चित्र असतं. आनंदी जोडपे कधीही दिवसाच्या सुरुवातीला कितीही घाई असली तरी एकमेकांकडे दुर्लक्ष करत नाहीत. ते किमान एकमेकांच्या डोळ्यात पाहून "गुड मॉर्निंग" म्हणतात. या छोट्या गोष्टींमधून एकमेकांबद्दलची काळजी व्यक्त करणारा मेसेज जातो. तुम्ही सकाळी एकमेकांशी संवादच साधला नाही तर संपूर्ण दिवस जोडीदाराला दुर्लक्षित केले असे वाटू शकतं.
सकाळची वेळ ही कधीच गंभीर विषयांवर चर्चा करण्याची नसते, कारण झोपेतून उठल्यावर आपलं शरीर आधीच तणावात असतं. त्यामुळे तक्रारी करण्याऐवजी आनंदी जोडपी आधी एकमेकांशी जुळवून घेतात. फक्त शेजारी बसणे किंवा सोबत कॉफी पिणे यामुळे मन शांत होतं आणि दिवसाची सुरुवात चांगली होते.
आनंदी जोडपे मनातील भावना एका वाक्यात स्पष्ट सांगतात. खूप मोठं बोलण्यापेक्षा स्वतःला कसं वाटतंय हे ते स्पष्टपणे सांगतात. "आज मला कामाचं थोडं टेन्शन आहे" किंवा "मी अजून पूर्ण जागा झालो नाहीये." यामुळे जोडीदाराला तुमच्या मनःस्थितीचा अंदाज येतो. उद्या जर तुम्ही चिडचिड केली, तर त्याला कारण माहीत असतं की तुम्ही आधीच तणावात आहात, त्यामुळे दिवसभर मनःस्थिती कशी राहणार आहे याचीही जाणीव होते. संवादातून मन मोकळे होते. मनमोकळा संवाद हा कोणतेही नातं अधिक दृढ करतो.
दिवसाच्या सुरुवातीला एकमेकांची मनःपूर्वक चौकशी करणे, एकत्र काही मिनिटे फिरायला जाणे, एकत्र गाणी ऐकणे किंवा नाश्ता करणे या छोट्या गोष्टी दाम्पत्याचे भावनिक नाते अधिक घट्ट करतात. या सवयी खूप सोप्या आहेत. मात्र नाते सुदृढ करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आनंदी दाम्पत्य घाईघाईत नाही, तर दिवसाची सुरुवात ही एकमेकांना अर्थपूर्ण स्पर्शाने करतात. साधा प्रेमाने धरलेला हात शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' वाढवतो. यामुळे घराबाहेर पडताना दोघांनाही मानसिक आधार आणि शांतता मिळते. ज्या दाम्पत्याचे जीवन आनंदी असते ते दिवसाची सुरुवात कामांची जबाबदारी आनंदाने वाटून घेतात. जेव्हा दोघे मिळून काम करतात, तेव्हा कोणावरही ताण येत नाही आणि घरातलं वातावरण आनंदी राहतं. ही एक 'टीम' म्हणून काम करण्याची पद्धत त्यांचे नाते अधिक आनंदी करते.
आनंदी जोडपे हे एकमेकांना प्रोत्साहन देऊन निरोप घेतात, घरातून बाहेर पडतात. "आजच्या मीटिंगसाठी शुभेच्छा" किंवा "तू हे नक्कीच चांगलं करशील" असं एक छोटं वाक्यही केवळ मानसिक आधार देत नाही तर खूप मोठी ऊर्जा देऊन जातं. यामुळे जोडीदाराला जाणीव होते की, तुम्ही सोबत नसलात तरी तुमचा पाठिंबा नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे, ही भावना खूपच महत्त्वपूर्ण ठरते.