क्रेडिट कार्ड Pudhari File Photo
अर्थभान

गुंतवणूक : आजीवन मोफत क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

पुढारी वृत्तसेवा

अनिल विद्याधर

विविध बँका आणि वित्तीय संस्था अनेकदा त्यांच्या ग्राहकांना कॉल करतात की, सर तुमच्या खात्यावर एक विशेष आजीवन मोफत क्रेडिट कार्ड ऑफर आहे. तुम्हाला हे कार्ड मिळवायचे आहे का? तुम्हालाही कधीतरी असा फोन आला असेल. पण, प्रश्न असा आहे की, आजीवन मोफत क्रेडिट कार्ड खरोखरच मोफत असतात का? की त्यामध्ये काही छुपे शुल्क किंवा अटी व शर्ती लागू असतात? चला जाणून घेऊया त्याचे वास्तव...

वास्तविक, बँका क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क आणि नूतनीकरण शुल्क आकारतात. ही फी दरवर्षी भरावी लागते. तथापि, बँका त्यांच्या काही क्रेडिट कार्डस्वर कोणतेही वार्षिक शुल्क न आकारता ग्राहकांना आजीवन मोफत क्रेडिट कार्ड म्हणून ऑफर करतात. पण, त्याचा अर्थ जोपर्यंत कार्डधारक त्याचे खाते चांगल्या स्थितीत ठेवतो तोपर्यंत तो कोणत्याही वार्षिक शुल्काशिवाय कार्ड वापरू शकतो. पारंपरिक क्रेडिट कार्डची वार्षिक फी शंभर रुपयांपासून ते अनेक हजार रुपयांपर्यंत असते. आजीवन मोफत क्रेडिट कार्डसाठी कोणतेही जॉइनिंग शुल्क भरावे लागत नाही. पण, तुम्ही कार्ड कसे वापरता यावर शुल्काचा निर्णय घेतला जातो. आजीवन मोफत क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या पात्रता नियमांमध्ये फरक असू शकतो. पण, काही अटी जवळपास सारख्याच असतात.

चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा

750 किंवा त्याहून अधिकचा क्रेडिट स्कोअर सामान्यतः उत्कृष्ट मानला जातो. हा स्कोअर आजीवन मोफत क्रेडिट कार्ड मिळविण्यास मदत करू शकते.

स्थिर उत्पन्न

बहुतेक क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या संस्था आणि बँका तुमचे उत्पन्न वार्षिक आधारावर स्थिर आहे की नाही हे पाहतात. अशा कार्डांना किमान वार्षिक उत्पन्नाची आवश्यकता असते, जी कार्डनुसार बदलते.

वेगवेगळ्या बँकांच्या ऑफरचे संशोधन आणि तुलना करा

विविध बँका वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह आजीवन मोफत क्रेडिट कार्ड देतात. त्यातील क्रेडिट लिमिट, वापरण्यासंदर्भातील अटी-शर्ती यांची तुलना करून याबाबतचा निर्णय घ्या.

प्रमोशनल ऑफरवर लक्ष ठेवा

काही बँका सध्याच्या कार्डंवर आजीवन मोफत सेवा अपग्रेड करण्याची ऑफर देतात. त्याकडे लक्ष द्या. बँकेत खाते किंवा पैसे असल्याने काही वेळा त्यांच्या क्रेडिट कार्ड ऑफरसाठी मंजुरी मिळणे सोपे होते. अनेक बँका यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑफर करतात. गरजेनुसार यासाठी अर्ज करता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT