"माझा मित्र राहुल द्रविडसाठी..." : सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. या विजयाचे श्रेय जितके टीम इंडियातील सर्वच खेळाडूंना जाते तेवढेच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आहे. त्यांनी बांधलेल्या टीमने क्रिकेटमधील सर्वच प्रारुपात ( टी-20, वन-डे आणि कसोटी) अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला आहे. टी-20 विश्वचषक विजयाने द्रविड गुरुजींवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा मित्र सचिन तेंडुलकरनेही त्यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत २००७ वन-डे विश्वचषकातील हृदयद्रावक आठवणी शेअर केली आहे.
वेस्ट इंडिजमध्ये भारतीय क्रिकेटचे एक वर्तुळ झाले पूर्ण...
सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वेस्ट इंडियमध्ये भारतीय क्रिकेटचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. २००७ वन-डे विश्वचषक स्पर्धेतील नीचांकापासून ते क्रिकेटमधील जगातील मोठी शक्ती बनण्यापर्यंतचा आणि २०२४ मध्ये टी20 विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. माझा मित्र राहुल द्रविडसाठी खूप आनंद झाला. तो २०११ विश्वचषक विजयापासून वंचित राहिला होता; परंतु यंदाच्या टी-20 विश्वचषक विजयात त्याचे योगदान खूप मोठे आहे. मी त्याच्यसाठी खूप आनंदी आहे.
काय घडलं होतं २००७ वन-डे विश्वचषक स्पर्धेत?
२००७ विश्वचषक स्पर्धा ही वेस्ट इंडिजमध्ये झाली होती. यावेळी संघाचे नेतृत्त्व राहुल द्रविड करत होता. या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका संघांकडून पराभूत होण्याची नामुष्की टीम इंडियावर ओढवला होती. भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. यानंतर देशभरात टीम इंडियावर टीकेचे आसूड ओढले गेले. या पराभवानंतर राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले. यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील संघात तो खेळला. वेस्ट इंडिजमध्येच राहुल द्रविड याने भारतीय क्रिकेटमधील सर्वात नामुष्कीजनक पराभव पाहिला होता. याच भूमीवर भारताने टी-२० विश्चचषकाला गवसणी घातली. त्यामुळेच राहुल द्रविड याने विजयाचा जल्लोष अतिशय आनंदाने साजरा केला.
