Alcohol Health Impact  AI-generated image
आरोग्य

Alcohol Health Impact : वाईन, बिअर की मद्य? आरोग्यावर कोणाचा किती घातक परिणाम? नव्या अभ्यासातील मोठा खुलासा

कोणत्याही प्रकारचे असले तरी अतिमद्यपान हे आरोग्यासाठी घातकच ठरते

पुढारी वृत्तसेवा

मद्याच्या प्रकारानुसार आरोग्यावर होणारे परिणाम वेगवेगळे असतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तब्बल ३ लाख ४० हजारांहून अधिक प्रौढांचा अभ्यास करण्यात आला.

Alcohol Health Impact : नियमित मद्यपान करणाऱ्यांमध्ये मद्याच्या विविध प्रकारांवर नेहमीच चर्चा झडत असतात. यामध्ये वाईन, बिअर आणि इतर कडक मद्याचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात, यावरही खल होतो. मद्याचा प्रकार कोणताही असो, त्याचे अतिसेवन हे आरोग्यासाठी नेहमीच हानिकारक असते. मात्र, मर्यादित प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांच्या बाबतीत आरोग्यावरील परिणाम हे अधिक गुंतागुंतीचे असल्याचे दिसून आले आहे. आता एका व्यापक संशोधनातून वाईन, बिअर, आणि इतर मद्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यांतील एक आश्चर्यकारक तफावत समोर आली आहे.

तब्बल ३ लाख ४० हजारांहून अधिक प्रौढांचा अभ्यास

मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक असते, हे सर्वांनाच माहित आहे. तरीही मद्याच्या प्रकारानुसार आरोग्यावर होणारे परिणाम वेगवेगळे असतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तब्बल ३ लाख ४० हजारांहून अधिक प्रौढांचा अभ्यास करण्यात आला असून, त्यातून वाईन, बिअर, सायडर आणि हार्ड लिकर (स्पिरिट्स) यांच्याशी संबंधित आरोग्य धोक्यांमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. अतिमद्यपान हे कोणत्याही प्रकारचे असले तरी ते आरोग्यासाठी घातकच ठरते; मात्र मर्यादित स्वरूपात मद्यपान करणाऱ्यांमध्ये चित्र काहीसे गुंतागुंतीचे असल्याचे दिसून आले आहे.

मद्याचे प्रमाण आणि प्रकार आरोग्‍यावर करतात दीर्घकालीन परिणाम

'सायन्स डेली'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक परिषदेत (ACC.26) हा महत्त्वपूर्ण अभ्यास सादर करण्यात आला. या संशोधनानुसार, अत्यंत कमी किंवा मध्यम प्रमाणात वाईन घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचा, विशेषतः हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी असल्याचे आढळले. याउलट, तितक्याच प्रमाणात बिअर किंवा इतर कडक मद्य घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असल्याचे दिसून आले. मद्याचे प्रमाण आणि त्याचा प्रकार या दोन्ही गोष्टी दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करतात, असे यातून स्पष्ट होते.

'वाईन प्यायल्याने आजारांपासून संरक्षण मिळते' असा अर्थ काढू नये

या निष्कर्षामुळे 'वाईन प्यायल्याने आजारांपासून संरक्षण मिळते' असा अर्थ काढू नये, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. कमी मद्यपान हेच आरोग्यासाठी नेहमी चांगले असते, या जुन्या निष्कर्षालाच या अभ्यासाने दुजोरा दिला आहे. चीनमधील सेंट्रल साऊथ युनिव्हर्सिटीच्या सेकंड झियांग्या हॉस्पिटलचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक डॉ. झांगलिंग चेन यांनी सांगितले की, "हे निष्कर्ष सर्वसामान्य लोकसंख्येवर आधारित आहेत. आधीच जुना आजार किंवा हृदयविकाराचा त्रास आहे, अशा अतिजोखमीच्या गटातील व्यक्तींसाठी मद्यपानाचे धोके यापेक्षाही अधिक असू शकतात."

असा झाला अभ्यास?

मद्यपानाच्या सवयी आणि आयुर्मान यांचा संबंध तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी २००६ ते २०२२ दरम्यान 'यूके बायोबँक'मध्ये नोंदणीकृत असलेल्या ३,४०,९२४ प्रौढांच्या माहितीचे विश्लेषण केले. अभ्यासात सहभागी होताना संबंधित व्यक्तींनी प्रश्नावलीद्वारे त्यांच्या मद्यपानाच्या सवयींची माहिती दिली होती. संशोधकांनी केवळ किती पेग दारु पिली हे मोजण्याऐवजी, दररोज किंवा आठवड्याला त्यांच्या शरीरात 'शुद्ध अल्कोहोल' किती जाते, यानुसार त्यांचे चार गटांत वर्गीकरण करण्‍यात आले. बिअर, वाईन आणि स्पिरिट्समध्ये अल्कोहोलचे प्रमाण वेगवेगळे वर्गीकरण केले गेले. ते वर्गीकरण खालीलप्रमाणे...

  • कधीतरी किंवा न पिणारे: आठवड्याला २० ग्रॅमपेक्षा (सुमारे दीड स्टँडर्ड ड्रिंक) कमी मद्यपान करणारे.

  • कमी प्रमाण: पुरुषांसाठी आठवड्याला २० ग्रॅम ते दररोज २० ग्रॅमपर्यंत, तर महिलांसाठी दररोज १० ग्रॅमपर्यंत.

  • मध्यम प्रमाण: पुरुषांसाठी दररोज २० ते ४० ग्रॅम (दीड ते तीन ड्रिंक्स) आणि महिलांसाठी १० ते २० ग्रॅम.

  • अतिप्रमाण: पुरुषांसाठी दररोज ४० ग्रॅमपेक्षा जास्त, तर महिलांसाठी २० ग्रॅमपेक्षा जास्त.

  • संशोधकांनी सरासरी १३ वर्षांहून अधिक काळ या सहभागींच्या आरोग्यावर लक्ष ठेवले.

हृदयाच्या आरोग्यावरील धोक्यांमध्ये मोठी तफावत

या अभ्यासातील सर्वात स्पष्ट निष्कर्ष अतिमद्यपानाबाबत होता. कधीही मद्य न पिणाऱ्यांच्या तुलनेत अतिमद्यपान करणाऱ्यांमध्ये कोणत्याही कारणाने मृत्यू होण्याचा धोका २४ टक्क्यांनी अधिक होता. त्यांचा कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका ३६ टक्क्यांनी, तर हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका १४ टक्क्यांनी जास्त होता. मद्याचा प्रकार कोणताही असो, अतिमद्यपानाचे हे दुष्परिणाम सारखेच होते.

एका मद्याऐवजी दुसरे मद्य निवडल्याने मृत्यूचा धोका कमी होत नाही

कमी आणि मध्यम प्रमाणात मद्यपान करणाऱ्यांमध्ये आश्चर्यकारक फरक दिसून आला. मध्यम प्रमाणात वाईन पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका मद्य न पिणाऱ्यांच्या तुलनेत २१ टक्क्यांनी कमी होता. याउलट, बिअर, सायडर किंवा स्पिरिट्सचे अगदी कमी प्रमाणात सेवन केल्यासही हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका ९ टक्क्यांनी वाढत असल्याचे आढळले. हा एक निरीक्षणात्मक अभ्यास असल्याने, एका मद्याऐवजी दुसरे मद्य निवडल्याने थेट मृत्यूचा धोका कमी होतोच, असा दावा करता येणार नाही, असेही संशोधकांनी नमूद केले आहे.

वाईनमुळे हृदयविकाराचा धोका कमी होता का ?

अन्‍य दारु आणि वाईनमध्‍ये तफावतीमागे संशोधकांनी वाईनची रासायनिक रचना आणि ती पिणाऱ्यांची जीवनशैली अशी दोन मुख्य कारणे सांगितली आहेत. रेड वाईनमध्ये 'पॉलीफेनॉल्स' नावाचे नैसर्गिक घटक असतात. अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक पेशींचे नुकसान होण्यापासून रोखतात आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करू शकतात.

मद्यपानाची वेळ आणि जीवनशैलीही ठरते महत्त्‍वाची

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मद्यपानाची वेळ आणि जीवनशैली. वाईन बहुतेकदा जेवणासोबत घेतली जाते आणि वाईन पिणाऱ्यांचा आहार व जीवनशैली तुलनेने अधिक आरोग्यदायी असल्याचे दिसून आले आहे. मात्र बिअर किंवा कडक दारु ( हार्ड लिकर) बहुतेकदा जेवणाव्यतिरिक्त इतर वेळी घेतली जाते. या गटातील लोकांचा आहार निकृष्ट दर्जाचा असणे आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या इतर सवयी असण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे हा फरक नेमका वाईनमुळे आहे की त्यांच्या उत्तम जीवनशैलीमुळे, हे वेगळे करणे कठीण असल्याचे डॉ. चेन यांनी स्पष्ट केले.

संशोधनाचे तात्पर्य काय?

या अभ्यासाच्या काही मर्यादा आहेत. हा अभ्यास केवळ सुरुवातीला दिलेल्या प्रश्नावलीवर आधारित असल्याने, नंतरच्या १३ वर्षांत लोकांच्या मद्यपानाच्या सवयींत झालेले बदल यात नोंदवले गेले नाहीत. तसेच, यूके बायोबँकमधील सहभागी हे सर्वसामान्य लोकांपेक्षा अधिक आरोग्यसंपन्न असल्याने हे निष्कर्ष सरसकट सर्वांना लागू होतीलच असे नाही. rhih cx" अतिमद्यपान हे नेहमीच प्राणघातक ठरते. वाईन पिणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका कमी दिसत असला, तरी 'हृदयाच्या आरोग्यासाठी वाईन पिणे सुरू करावे' असा याचा अजिबात अर्थ होत नाही. मद्यपान आणि मृत्यू यांचा संबंध अत्यंत गुंतागुंतीचा असून, कोणतेही मद्य आरोग्याला संरक्षण देते हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असेही संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT