

India Alcohol Consumption
नवी दिल्ली: जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीनसारख्या बड्या देशांमध्ये मद्यपानाचे प्रमाण कमी होत असताना, भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे. 'आयडब्ल्यूएसआर' या मद्य-संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या पहिल्या सहामाहीत भारतात मद्यपानाचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. संस्थेने अभ्यासलेल्या २१ प्रमुख बाजारपेठांपैकी ही सर्वाधिक वाढ आहे.
विशेष म्हणजे, या २१ देशांमध्ये भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे बिअर आणि व्हिस्कीपासून ते व्होडका, जिन आणि वाईनपर्यंत मद्याच्या प्रत्येक प्रकाराला मागणी वाढली आहे. जगातील इतर बाजारांमध्ये मागणी घटल्यामुळे मद्य उद्योग मंदीचा सामना करत असताना भारतात मात्र वेगळ चित्र पाहायला मिळत आहे.
या कालावधीत बिअरच्या विक्रीत सर्वाधिक १६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. प्री-मिक्स कॉकटेलसारख्या ‘रेडी-टू-ड्रिंक’ (RTD) पेयांमध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली, तर भारतीय व्हिस्कीच्या खपात ४ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय स्कॉच व्हिस्की ८ टक्के, व्होडका आणि जिन प्रत्येकी ६ टक्के, तर रम व ब्रांडीच्या विक्रीत ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, ‘नो-अल्कोहोल बिअर’ची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे. टक्केवारीच्या दृष्टीने सर्व मद्यप्रकारांच्या तुलनेत या श्रेणीने सर्वाधिक वेगाने वाढ नोंदवली आहे.
जागतिक स्तरावर मद्याच्या एकूण खपापैकी ७६ टक्के वाटा असलेल्या २१ देशांमध्ये पहिल्या सहामाहीत मद्यविक्री १ टक्क्याने घटली आहे. जगातील सर्वात मोठ्या मद्य बाजारांपैकी एक असलेल्या अमेरिकेत खपात ४ टक्के आणि चीनमध्ये ३ टक्क्यांची घट झाली आहे. अमेरिकेत बिअरची विक्री ४ टक्क्यांनी, तर चीनमध्ये २ टक्क्यांनी घसरली आहे. मात्र, अमेरिका आणि चीनला बाजूला ठेवल्यास उर्वरित देशांमध्ये १ टक्क्याची वाढ दिसून येते.
वाढीच्या दरामध्ये भारत अव्वल स्थानी आहे. त्यानंतर कोलंबिया (९%), दक्षिण आफ्रिका (५%), ब्राझील (३%) आणि युनायटेड किंगडम (२%) यांचा क्रमांक लागतो. मेक्सिको आणि थायलंडमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे, मात्र आयडब्ल्यूएसआरने त्याचे नेमके दर दिलेले नाहीत.
आयडब्ल्यूएसआरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मार्टेन लोडेव्हिक्स यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले, "जागतिक मद्य उद्योगासाठी भारत ही सर्वांत महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि ताज्या आकडेवारीवरून हे पुन्हा एकदा स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करू पाहणारे जागतिक ब्रँड्स आता भारताकडे आपल्या वाढीच्या योजनांमधील एक महत्त्वाचा स्रोत म्हणून पाहत आहेत." विविध प्रकारच्या पेयांच्या बाबतीतही हा फरक दिसून येतो. २१ बाजारपेठांमध्ये 'स्टिल वाइन'च्या (नॉन-कार्बोनेटेड वाइन) खपात ४ टक्क्यांनी घट झाली असताना, भारतात मात्र त्यात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या बाजारपेठांमध्ये 'अल्कोहोल-मुक्त' बिअरच्या खपात ८ टक्क्यांनी वाढ झाली, तर भारतात ही वाढ २५ टक्के इतकी होती.
आयडब्ल्यूएसआरच्या मते, मद्यपानाचे प्रमाण कमी करण्याकडे असलेला कल आणि वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'जीएलपी-१' (GLP-1) औषधांचा वापर, यांमुळे जागतिक स्तरावर मद्यपानावर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेत महागाई, आयात शुल्क आणि आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम ग्राहकांवर झाला आहे, तर चीनमध्ये अर्थव्यवस्थेचा मंदावलेला वेग आणि इतर संरचनात्मक आव्हानांमुळे मागणीवर परिणाम झाला आहे.