

Alcohol Consumption Risks : मद्यपान सेवनाबाबत आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. यातील एक मोठा गैरसमज म्हणजे, अल्प प्रमाणात केलेले मद्यपान सुरक्षित असते. हा एक समज खोटा आहे; कारण सर्वसामान्य लोक अशा प्रकारच्या मद्यपानाचा अर्थ "पूर्णपणे धोका नाही," असाच करतात. मात्र, शल्यचिकित्सक डॉ. जेरेमी लंडन यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये हा गैरसमज दूर केला आहे.
एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये, जॉर्जियातील सवाना येथील हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. लंडन यांनी, मद्यपानाची कोणतीही धोकारहित पातळी का नाही, यावर प्रकाश टाकला आहे. ते कर्करोगाच्या धोक्यांवरील संशोधन, निरीक्षणात्मक अभ्यास आणि अनुवांशिक पुराव्यांचा संदर्भ देत त्यांनी माफक प्रमाणात मद्यपान आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते" या जुन्या कल्पनेला छेद दिला आहे.
डॉ. लंडन सांगतात, "बिअर, वाईन किंवा इतर कोणतेही मद्य प्राशन केल्यावर आपले यकृत (Liver) त्याचे रूपांतर 'ॲसिटाल्डिहाइड'मध्ये आणि नंतर 'ॲसिटेट'मध्ये करते. यातील 'ॲसिटाल्डिहाइड' हा घटक अत्यंत घातक असून तो शरीराच्या पेशींसाठी विषारी असतो. हा घटक शरीरातील प्रत्येक पेशीला हानी पोहोचवतो, पेशींचे 'डीएनए' (DNA) खराब करतो आणि त्यांची दुरुस्ती होण्यात अडथळे निर्माण करतो."
दशकांपासून, निरीक्षणात्मक अभ्यासातून असे दिसून येत होते की, मध्यम प्रमाणात मद्यपान करणारे लोक मद्यपान न करणाऱ्यांपेक्षा जास्त जगतात. यामुळे, माफक प्रमाणात मद्यपान केल्याने आरोग्याला फायदे मिळू शकतात, या विश्वासाला बळ मिळाले. परंतु, डॉ. लंडन म्हणतात की, मद्यपान न करणाऱ्यांचे वर्गीकरण कसे केले गेले, यावर या निष्कर्षांचे परिणाम अवलंबून होते."परंतु 'मद्यपान न करणाऱ्या' गटामध्ये आजारपणामुळे मद्यपान सोडलेल्या लोकांचाही समावेश होता. त्यामुळे मद्यपान न करणारे लोक कमी निरोगी दिसू लागले आणि माफक प्रमाणात मद्यपान करणे संरक्षक वाटू लागले. आधीपासून असलेल्या आरोग्य समस्यांमुळे मद्यपान सोडलेल्या लोकांमुळे, मद्यपान न करणारा गट प्रत्यक्षात जितका निरोगी दिसला असता, त्यापेक्षा कमी निरोगी दिसू शकतो. त्यामुळे तुलनेने माफक प्रमाणात मद्यपान करणे अधिक फायदेशीर वाटू शकते."
डॉ. लंडन म्हणतात, "जेव्हा आपण उत्पन्नाची पातळी, शिक्षण आणि एकूण आरोग्य यांचा विचार करतो, तेव्हा असं लक्षात येतं की थोडीफार दारू पिणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती आणि आरोग्य बऱ्याचदा चांगलं असतं." हे घटक म्हणजेच संपत्ती किंवा चांगलं शिक्षण माणसाच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. त्यामुळेच, "थोडं मद्यपान केल्यामुळे आरोग्याला खरोखरच फायदा होतो का, की त्यांच्या इतर चांगल्या परिस्थितीमुळे ते निरोगी आहेत?" हे निश्चित करणं कठीण होऊन बसतं.
डॉ. लंडन जनुकीय अभ्यासांकडेही लक्ष वेधतात. ते म्हणतात, हे अभ्यास मद्यपान and आरोग्याचा संबंध समजून घेण्याचा एक वेगळा मार्ग आहेत, कारण यात व्यक्तीची संपत्ती किंवा जीवनशैलीचा संबंध नसून पूर्णपणे अनुवंशिक घटकांचा अभ्यास केला जातो. मद्यपानाचा शरीराला कोणताही फायदा (संरक्षणात्मक परिणाम) होत नाही. उलट, तुम्ही मद्यपानाचे जितके जास्त पेग घ्याल, तितका आरोग्याचा धोका वाढत जातो. हे निष्कर्ष 'थोडंफार मद्यपान करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते' या जुन्या समजुतीला खोटे ठरवतात. जेव्हा संशोधक इतर बाबी बाजूला सारून फक्त मद्यपानाचा शरीरावर होणारा परिणाम तपासतात, तेव्हा मद्यपानाचे पूर्वी सांगितले जाणारे फायदे टिकत नाहीत.
"दारू प्यायची की नाही, हा पूर्णपणे प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आमचे काम तुम्हाला फक्त माहिती देणे आहे, तुमच्यावर आमचे विचार लादणे नाही." मात्र, त्यांचा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे की, कमी मद्यपानातही धोका असतोच. त्यामुळेच डॉ. लंडन शेवटी म्हणतात, "आरोग्याच्या दृष्टीने विचार केला, तर जास्त दारू पिण्यापेक्षा कमी पिणे कधीही चांगले; पण अजिबात न पिणे हा आरोग्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे."