Cosmeticorexia ( AI-generated image ) Pudhari
आरोग्य

Cosmeticorexia : त्वचेला काही झालंय या चिंतेने सतत आरशात बघताय? तुम्हाला 'या' आजाराने ग्रासलंय

‘ग्लास स्किन’च्या नादात शारीरिकसह मानसिक आरोग्‍यही धोक्‍यात

पुढारी वृत्तसेवा

Cosmeticorexia : मागील काही वर्षांत सोशल मीडियामुळे तरुणाईचं जगणंच बदललं.आभासी जगाच्या विळख्यात अडकलेल्या सर्वांनाच आपली त्वचा नितळ म्हणजे काचेसारखी स्वच्छ असावी, असे वाटणे हे काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. मात्र, अशा प्रकारची त्वचा व्हावी म्हणून पछाडलेल्यांच्‍या संख्येने आता मानसिक आजाराचे रूप घेतले आहे. याला वैद्यकीय भाषेत 'कॉस्मेटिकोरेक्सिया' (Cosmeticorexia) अशी संज्ञा देण्यात आली आहे. नितळ त्‍वचेच्‍या या क्रेझमुळे त्वचेचे तर नुकसान होत आहेच, त्याचबरोबर मानसिक आरोग्याचेही अतोनात नुकसान होत आहे. जाणून घेऊया कॉस्मेटिकोरेक्सियाविषयी...

१८ वर्षांच्या मुलीने अँटी-एजिंग उत्पादनांनी खराब केली त्वचा

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. कबीर सरदाना यांच्याकडे १८ वर्षांची मुलगी मुरुमांच्या त्रासावर उपचारासाठी आली होती. जेव्हा डॉक्टरांनी तिची स्किनकेअर उत्पादने तपासली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ती मुलगी टोनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन सोबतच प्रौढ त्वचेसाठी असणारे 'अँटी-एजिंग' प्रॉडक्ट्स आणि एक्सफोलिएटिंग ॲसिड असलेले स्क्रब वापरत होती. डॉक्टरांनी सांगितले की, "तिने या सौंदर्यप्रसाधनांवर हजारो रुपये खर्च केले होते. आम्ही तिची अनावश्यक उत्पादने बंद केली आणि केवळ आवश्यक औषधे सुरू केली. एका महिन्यात तिची त्वचा स्वच्छ झाली. आम्ही फक्त तिला तिची निरुपयोगी उत्पादनांनी झाकलेली नैसर्गिक त्वचा दाखवून दिली."

मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात

हुबळी येथील 'मानस इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल HEALTH'चे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आलोक कुलकर्णी यांनी एका १३ वर्षांच्या मुलीचे उदाहरण दिले. ती दररोज रात्री १ ते २ तास घालवून ८ ते १२ स्किनकेअर उत्पादने वापरायची. एखादा दिवस तिचे स्किनकेअर वापरणे राहून गेले किंवा मुरुम आला, तर ती प्रचंड अस्वस्थ व्हायची. मेकअपशिवाय ती शाळेत जाण्यासही नकार द्यायची. शेवटी तिला 'इरिटंट कॉन्टॅक्ट डर्माटायटिस' नावाचा त्वचेचा आजार झाला. या संदर्भात फोर्टिस हॉस्पिटल (मोहाली) येथील मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. सविता मल्होत्रा यांच्या मते, "ज्या किशोरवयीन मुलांचा आत्मसन्मान कमी असतो किंवा ज्यांना समवयस्कांकडून मान्यतेची गरज असते, ते या मानसिक वेडाला लवकर बळी पडतात."

नेमकं काय आहे 'कॉस्मेटिकोरेक्सिया'?

आपली त्वचा नितळ म्हणजे काचेसारखी स्वच्छ असावी असे वाटणे, याला अद्याप औपचारिकपणे मानसिक आजार म्हणून मान्यता मिळालेली नसली, तरी इटालियन संशोधकांनी 'डर्मेटोलॉजी अँड थेरपी'मध्ये या संज्ञेचा उल्लेख केला आहे. "सौंदर्यप्रसाधने आणि विविध प्रक्रियांचा अयोग्य किंवा सक्तीने वापर करून निर्दोष त्वचा मिळवण्याची सांस्कृतिकदृष्ट्या दृढ झालेली आसक्ती" म्हणजे कॉस्मेटिकोरेक्सिया होय.

'कॉस्मेटिकोरेक्सिया'ची प्रमुख लक्षणे कोणती?

  • सतत आरशात चेहरा तपासणे आणि शरीरातील किरकोळ दोषांबद्दल चिंता करणे.

  • मेकअपशिवाय लोकांमध्ये जाण्यास किंवा सामाजिक कार्यक्रमांना जाण्यास नकार देणे.

  • त्वचेवरील नैसर्गिक छिद्र किंवा असमान रंगामुळे अस्वस्थ होणे.

  • गरज नसतानाही अँटी-एजिंग आणि महागडी उत्पादने पुन्हा पुन्हा खरेदी करणे.

हा ट्रेंड सोशल मीडियावर का वाढत आहे?

हा ट्रेंड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, समवयस्कांचा दबाव आणि अल्पवयीन मुलांना लक्ष्य करणाऱ्या आक्रमक ब्युटी मार्केटिंगमुळे वाढत आहे. कोरियन स्किनकेअर वापराची क्रेझ याला आणखी खतपाणी घालत आहे. इटलीमध्ये तर अशा लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या उच्चभ्रू सौंदर्य ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे.

चेहऱ्याचा असमान रंग हा आजार नाही!

याबाबत एम्स (AIIMS) गुवाहाटी येथील त्वचारोग विभागाच्या प्रमुख डॉ. नेरिटा हजारिका स्पष्ट करतात की, "आपल्या देशातील लोकसंख्येमध्ये चेहऱ्याच्या त्वचेचा असमान रंग असणे अत्यंत सामान्य आहे, हा कोणताही आजार नाही. तरीही लोक ऑनलाइन अनोळखी लोकांचे ऐकून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय (Prescription) मिळणारी क्रीम्स वापरतात. यामुळे त्वचेचा दाह आणि पिगमेंटेशन वाढते. किशोरवयीन मुलांमध्ये अँटी-एजिंग सौंदर्यप्रसाधनांच्या वापराला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तरुण त्वचा ही प्रौढ त्वचेपेक्षा अधिक संवेदनशील असते. रेटिनॉल्स, एक्सफोलिएटिंग ॲसिड्सच्या अतिवापरामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर (Skin Barrier) नष्ट होतो, ज्यामुळे ॲलर्जी आणि जळजळ वाढते."

त्वचेच्या आरोग्यासाठी नेमकं काय करावं?

  • जाहिरातींना बळी न पडता क्रीमचा बेस समजून घेणे महत्त्वाचे असते. महागडी उत्पादने किंवा क्रीम्स नेहमीच चांगल्या असतात असे नाही; ओव्हर-द-काउंटर मिळणाऱ्या अशा क्रीम्समुळे वृद्धत्व रोखता येत नाही, त्यामुळे त्यांचा अतिवापर टाळावा.

  • त्वचेच्या खऱ्या आरोग्यासाठी 'रेनबो डाएट' म्हणजेच अँटीऑक्सिडंटने समृद्ध अन्न, भरपूर पाणी आणि ७ ते ८ तासांची चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे.

  • त्वचेसाठी नेहमी एक साधा दिनक्रम पाळावा, ज्यामध्ये सौम्य क्लीन्झर, त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर आणि घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर पुरेसा ठरतो

  • प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने तेलकट, कोरडी किंवा संवेदनशील त्वचा ओळखून नेहमी त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्यानेच योग्य ते उपचार करावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT