heart attack alone 
आरोग्य

जीव वाचवणारे 'गोल्डन मिनिट्स': एकटं असताना हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे?

heart attack alone : जीव वाचवण्यासाठी 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

मोनिका क्षीरसागर

२०२४ ते २०२५ या वर्षात जवळजवळ अर्ध्याहून अधिक हृदयविकाराचे बळी अशावेळी गेले, जेव्हा ती व्यक्ती एकटी होती. तिला वेळेवर मदत मिळाली नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशावेळी त्वरित आणि योग्य प्रतिसाद मिळाल्यास संबंधित व्यक्तीचा जीव नक्कीच वाचू शकतो.

हृदयविकाराचा झटका कधीही येऊ शकतो. जर तुम्ही एकटे असाल, तर हा अनुभव खूप भीतीदायक आणि जीवघेणा ठरू शकतो. मागील दोन वर्षांतील आकडेवारी दर्शवते की, अनेक अचानक मृत्यू तेव्हा झाले, जेव्हा पीडित व्यक्ती एकटी होती. याचे मुख्य कारण हे आहे की अनेकांना हृदयविकाराची लक्षणे लवकर ओळखता येत नाहीत किंवा ते त्वरित प्रतिसाद देत नाहीत.

काहींना छातीत हलका दाब, थकवा किंवा अपचन यांसारखी सौम्य लक्षणे तासभर किंवा दिवसांपूर्वी जाणवतात, तर काहींना काही मिनिटांतच छातीत तीव्र वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. अशा गंभीर क्षणांमध्ये मदत मिळेपर्यंत काय करावे, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

१. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी लक्षणे ओळखा

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी बहुतांश लोकांना काही चेतावणीची लक्षणे (warning symptoms) दिसतात, पण ते ती दुर्लक्षित करतात. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दाब किंवा जडपणा जाणवणे, ज्याचे वर्णन अनेकदा पिळवटून टाकल्यासारखे किंवा जळजळ झाल्यासारखे केले जाते. ही वेदना जबडा, मान, खांदा, हात किंवा पाठ या भागांत पसरू शकते. श्वास लागणे, मळमळ, हलके डोकेदुखी आणि घाम येणे ही इतर लक्षणे आहेत. महिला आणि मधुमेहींमध्ये थकवा, अपचन किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना यांसारखी असामान्य लक्षणे दिसू शकतात. ही सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित मदत घेणे हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

२. लगेच मदतीसाठी कॉल करा, वाट पाहू नका

जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्याची शंका असेल, तर त्वरित तुमच्या स्थानिक आपत्कालीन क्रमांकावर (उदा. भारतात १०८) कॉल करा. वैद्यकीय मदतीसाठी काही मिनिटांचा विलंब देखील मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. जर तुम्ही एकटे असाल, तर फोन जवळ ठेवा आणि शेजारी किंवा कुटुंबातील सदस्याला त्वरित व्हॉईस मेसेजद्वारे कळवा. स्वतः गाडी चालवून रुग्णालयात जाणे टाळा, जोपर्यंत तुमच्या मदतीला कोणीच उपलब्ध नसेल. आपत्कालीन पथक (Emergency teams) येतानाच आवश्यक उपचार सुरू करू शकतात, ज्यामुळे वाचण्याची शक्यता खूप वाढते.

३. शांत रहा, ताठ बसा, खाली झोपणे टाळा

मदतीसाठी कॉल केल्यानंतर, शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. पाठीला आधार देऊन आणि पाय जमिनीवर ठेवून ताठ बसा. यामुळे हृदयावरील दाब कमी होण्यास मदत होते. खाली झोपू नका किंवा फिरू नका. कोणतीही हालचाल किंवा श्रम केल्यास हृदयातील ऑक्सिजनची मागणी वाढते, ज्यामुळे नुकसान आणखी वाढू शकते. मदत मिळेपर्यंत हळू आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा.

४. ॲस्पिरिनची गोळी (Aspirin) चावून खा (जर ॲलर्जी नसेल तर)

जर तुमच्याकडे ॲस्पिरिनची (३०० मिग्रॅ) गोळी उपलब्ध असेल, तर आपत्कालीन सेवेला कळवल्यानंतर ती हळू हळू चावून खा. ॲस्पिरिन रक्त पातळ करण्यास मदत करते आणि कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये (coronary arteries) पुढील गुठळ्या (clot) तयार होण्यास प्रतिबंध करते. फक्त तेव्हाच ॲस्पिरिन घ्या जेव्हा तुम्हाला त्याची ॲलर्जी नसेल किंवा रक्तस्रावाचा (bleeding disorders) कोणताही जुना आजार नसेल. खात्री नसल्यास, फोनवर वैद्यकीय पुष्टी मिळाल्यानंतरच घ्या.

५. 'खोकला सीपीआर' (Cough CPR) या मिथकावर विश्वास ठेवू नका

हृदयविकाराच्या वेळी 'खोकला सीपीआर' (जोरदार खोकला करून हृदयाला चालू ठेवणे) हा जीव वाचवू शकतो, असा एक गैरसमज आहे. ही पद्धत केवळ रुग्णालयातील विशिष्ट परिस्थितीतच प्रभावी ठरते आणि घरी अजिबात करू नये. त्याऐवजी, मदतीसाठी कॉल करण्यावर, शांत राहण्यावर आणि आपला श्वासमार्ग मोकळा ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही बेशुद्ध झालात आणि कोणी तुमच्याजवळ पोहोचले, तर त्यांनी त्वरित सीपीआर (CPR - Cardiopulmonary resuscitation) सुरू करावा. हृदयविकाराचा झटका कधीही येऊ शकतो, पण योग्य जागरूकता आणि त्वरित कृती जीव वाचवू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT