मुंबई : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर गोल्डन अवरमध्ये औषधोपचार करुन मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि तीव्र हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे ओळखण्यासह लवकर उपचार घेण्यासाठी व जास्तीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. राज्यात यंदा चार महिन्यांत हृदयविकाराचे 4022 गंभीर रुग्ण मिळाले, तर स्टेमीचे 662 रुग्ण मिळाले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये कोरोनरी आर्टरी रोगांमुळे मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील तीन ते चार टक्के आणि शहरी भागात आठ ते दहा टक्के व्यक्तींना हृदय रोग असल्याची चिंता व्यक्त राज्याच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात हृदयविकार व त्यासंबंधित आजार प्रामुख्याने आढळून येत आहेत. राज्यामध्ये हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडणार्यांपैकी हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणार्या मृत्यूंपैकी हृदयविकाराचा झटका हा आजार प्रथम क्रमांकावर येतो.
पहिल्या टप्प्यात राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अकोला, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, जालना आणि कोल्हापूर या 12 जिल्ह्यांमध्ये 38 हब आणि 145 स्पोक्सच्या माध्यमातून फेब्रुवारी 2021 पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास सुरवात करण्यात आली. प्रकल्पाचा दुसरा टप्पा एप्रिल 2024 पासून कार्यान्वित करण्यात आला असून राज्यातील उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमविस्तार करण्यात आला आहे.
या टप्प्यात उर्वरित 22 जिल्ह्यांतील 220 ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, जिल्हा व सामान्य रुग्णालये तसेच राज्याच्या 34 जिल्ह्यांतील सर्व 1906 प्राथमिक आरोग्य केंद्रा प्रकल्पविस्तारात स्पोक स्वरुपात समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमांतर्गत राज्यात हब आणि स्पोक्सचे जाळे निर्माण करण्यात आले असून त्या माध्यमातून प्रकल्पांतर्गत सेवा प्रदान केल्या जात आहेत. हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यासाठी स्टेमी हा प्रकल्प राज्यातील जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला होता.
हृदय विकाराची प्रमुख कारणे :
उच्च रक्तदाब व मधुमेह हे आजार असणे
अनुवांशिकता
असंतुलित आहार
शारिरीक हालचाली न करणे
तंबाखूचे व्यसन, मद्यपान इत्यादी व्यसन
दैनंदिन जीवनशैली
मानसिक तणाव
‘स्टेमी’तून असा होतो हृदयविकारापासून बचाव
स्पोक्स स्वरुपात समाविष्ट शासकीय रुग्णालयांत स्थापित अत्याधुनिक ईसीजी उपकरणाच्या सहाय्याने हृदयरोगाची लक्षणे आढळलेल्या रुग्णाचा ईसीजी काढून क्लाऊडवर अपलोड केला जातो. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून हृदयरोगतज्ज्ञ काही मिनिटांतच ईसीजीचे विश्लेषण करून निदान करतात. याकरिता बंगळुरूस्थित ट्रायकोंग हेल्थ या संस्थेशी सांमजस्य करार करण्यात आला आहे. हा विश्लेषण अहवाल इंटरनेटच्या मदतीने काही मिनिटांतच संबंधित रुग्णालयास पाठविला जातो.
सद्यस्थितीतील हा कालावधी सरासरी 4 मिनिटे इतका आहे. स्टेमीचे निदान झालेल्या रुग्णाला स्पोक रुग्णालयात उपलब्ध असल्यास, त्वरित थॅबोलायसिस उपचार देऊन पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिका सेवेच्या मदतीने जवळच्या हब संस्थेकडे पाठविले जाते. यासाठी हब व स्पोक संस्था यांच्या परस्पर समन्वयाद्वारे रुग्णास वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येते.
22 जिल्ह्यांत 220 ग्रामीण रुग्णालये, 1906 स्पोक
22 जिल्ह्यांतील 220 ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, जिल्हा व सामान्य रुग्णालये तसेच राज्याच्या 34 जिल्ह्यांतील 1906 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रकल्पविस्तारात स्पोक स्वरुपात समावेश करण्यात आला असून स्टेमीअंतर्गत सेवा प्रदान करण्यास सुरवात झाली आहे.
स्टेमी म्हणजे काय?
स्टेमी म्हणजे एसटी एलिव्हेशन इन मायोकार्डियल इन्फार्शन हा सामान्यतः आढळणारा हृदयविकाराचा प्रकार असून यात हृदयाच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा थांबल्यामुळे अपुर्या ऑक्सिजन अभावी हृदयाच्या मांसपेशींना इजा होते व त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.