Female infertility 
आरोग्य

Female infertility: महिलांच्या वंध्यत्वाला उपाय सापडला?...शास्त्रज्ञांनी 'त्वचेच्या पेशीं'पासून बनवले 'स्त्रीबीज'

प्रजननक्षम 'स्त्रीबीजे' तयार करण्याचे सुरुवातीचे प्रयोग अमेरिकेतील वैज्ञानिकांनी नुकतेच यशस्वी केल्याचे समोर आले आहेत.

मोनिका क्षीरसागर

Female infertility treatment eggs from skin cells research 2025 news

ज्या महिलांना त्यांच्या नैसर्गिक स्त्रीबीजांमध्ये (Eggs) काही समस्या असल्यामुळे जनुकीय मुले (Genetic Children) जन्माला घालू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आता भविष्यात एक मोठी आशा निर्माण झाली आहे. त्वचेच्या पेशींचा वापर करून कार्यात्मक मानवी अंडी (functional human eggs) म्हणजेच प्रजननक्षम स्त्रीबीजे तयार करण्याचे सुरुवातीचे प्रयोग अमेरिकेतील वैज्ञानिकांनी यशस्वी केले आहेत.

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक खूप महत्त्वाचा आणि सुरुवातीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी त्वचेच्या पेशींचा वापर करून प्रजननक्षम मानवी स्त्रीबीजे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 'नेचर कम्युनिकेशन्स' नावाच्या एका मोठ्या वैज्ञानिक मासिकात याबद्दलची माहिती छापून आली आहे.

ही नवीन पद्धत नेमकी काय आहे?

ही पद्धत थोडी गुंतागुंतीची असली तरी, सोप्या भाषेत समजून घेऊया:

  • महिलेच्या त्वचेच्या पेशीतील केंद्रक (Nucleus) बाहेर काढतात. (केंद्रकातच आपल्या शरीराची संपूर्ण जनुकीय माहिती असते.)

  • हे केंद्रक नंतर दुसऱ्या एका अंड्यामध्ये (ज्याचे स्वतःचे केंद्रक काढले आहे) टाकले जाते.

  • पण, इथे एक मोठी अडचण होती, त्वचेच्या पेशींमध्ये ४६ गुणसूत्र (Chromosomes) असतात.

  • परंतु, स्त्रीबीजामध्ये फक्त २३ गुणसूत्रे आवश्यक असतात (कारण राहिलेली २३ गुणसूत्रे पुरुषाच्या शुक्राणूंमधून मिळतात).

  • मागील अनेक प्रयत्नांमध्ये ही जास्त असलेली गुणसूत्रे काढून टाकणे शास्त्रज्ञांसाठी खूप मोठे आव्हान होते.

'मायटोमेओसिस'ची मदत

ओरेगॉन हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटीच्या (OHSU) शास्त्रज्ञांनी 'मायटोमेओसिस' (Mitomeiosis) नावाच्या एका नवीन प्रक्रियेचा वापर करून ही समस्या सोडवली आहे. या प्रक्रियेमुळे, त्वचेच्या पेशींमधील अतिरिक्त ४६ गुणसूत्रांचा संच बाजूला होतो आणि स्त्रीबीजासाठी लागणारे फक्त २३ गुणसूत्र शिल्लक राहतात.

शास्त्रज्ञांचे मत आणि सध्याची स्थिती

या अभ्यासाचे प्रमुख शौखरात मितालीपोव्ह सांगतात, "जी गोष्ट करणे अशक्य मानले जात होते, ती आम्ही करून दाखवली आहे. निसर्गाने आपल्याला पेशी विभाजनाच्या दोन पद्धती दिल्या होत्या, आम्ही आता तिसरी पद्धत विकसित केली आहे."

सध्याचे निष्कर्ष काय आहेत:

प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी अशा ८२ सुधारित स्त्रीबीजांचे शुक्राणूंच्या मदतीने फलन केले. त्यापैकी, सुमारे ९% स्त्रीबीजे 'ब्लास्टोसिस्ट' (Blastocyst) नावाच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली. IVF उपचारात याच टप्प्यावर गर्भ गर्भाशयात सोडला जातो. मात्र, अजूनही या तयार केलेल्या बहुतेक स्त्रीबीजांमध्ये गुणसूत्रांची काही विकृती (Abnormality) दिसून आली, ज्यामुळे त्यांचा विकास पुढे झाला नाही.

भविष्यात काय होऊ शकते?

युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्प्टनच्या प्रजनन तज्ज्ञ यिंग चेओंग यांनी या संशोधनाचे खूप कौतुक केले आहे. त्यांच्या मते, "ज्या लोकांना वाढत्या वयामुळे किंवा इतर वैद्यकीय कारणामुळे स्वतःचे स्त्रीबीज वापरता येत नाही, अशी समस्या असणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. हा जरी सुरुवातीचा प्रयोग असला तरी, भविष्यात यामुळे वंध्यत्व आणि गर्भपात (Miscarriage) यांसारख्या समस्या समजून घेण्यास मदत होईल. ज्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय नाही, त्यांच्यासाठी स्त्रीबीजे किंवा शुक्राणूसारख्या पेशी प्रयोगशाळेत तयार करण्याचा एक नवीन मार्ग खुला होऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT