

सध्या तरुणांमध्ये फिट बॉडी बनवण्याचा क्रेझ वाढत आहे. व्यायामशाळेत जाणारे तरुण, अॅथलिट्स बॉडीबिल्डिंगसाठी स्टिरॉईडचा वापर करतात. पण अनेकदा मनात हा प्रश्न येतो की, स्टिरॉईड्स घेतल्याने प्रजननक्षमतेवर (fertility) काही परिणाम होतो का? पुरुषांची वडील होण्याची क्षमता कमी होते का?
अलीकडे बहुजन समाज पक्ष (BSP) प्रमुख मायावती यांच्या पुतणीने आपल्या पतीवर नपुंसकतेचा आरोप केला आहे. तिने सांगितले की, लग्नापूर्वी तिच्या पतीने स्टिरॉईडचे इंजेक्शन घेतले होते आणि त्यामुळे त्यांची प्रजननक्षम कमी झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्टिरॉईड्सच्या वापरावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, स्टिरॉईड्स हे जादूची कांडी नसून एक रासायनिक संयुग आहे जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी, हार्मोन नियंत्रणासाठी किंवा मसल्स वेगाने तयार करण्यासाठी वापरले जाते.
अनाबोलिक स्टिरॉईड्स (bodybuilding साठी)
कॉर्टिकोस्टिरॉईड्स (आस्थमा, संधिवात यांसारख्या आजारांसाठी डॉक्टरांकडून दिले जाणारे).
अत्याधिक प्रमाणात स्टिरॉईड्स घेतल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. विशेषतः पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर परिणाम होतो, जो प्रजननक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचा परिणाम म्हणून स्पर्म काउंट कमी होणे, वंध्यत्वाची शक्यता निर्माण होणे, अशा समस्या उद्भवू शकतात.
जेव्हा एखादा पुरुष नियमितपणे अनाबोलिक स्टिरॉईड्स घेतो, तेव्हा त्याच्या शरीरातील नैसर्गिक टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन कमी होते. त्यामुळे काही पुरुषांमध्ये तात्पुरते वंध्यत्व देखील दिसून येते. पण जर वेळेत स्टिरॉईड्स घेणे बंद केले आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला, तर ही स्थिती हळूहळू पूर्ववत होऊ शकते.
महिलांमध्ये स्टिरॉईड्स घेतल्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, ओव्ह्युलेशन थांबणे (अंडी तयार होण्याची प्रक्रिया), यामुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येतात. तसेच, हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर केस येणे, आवाज जाड होणे असे पुरुषसदृश लक्षणे देखील दिसून येऊ शकतात.
हा परिणाम कायमस्वरूपी असेलच असे नाही. जर वेळेवर स्टिरॉईड्स घेणे थांबवले आणि शरीराला नैसर्गिकरित्या रिकव्हर होऊ दिले, तर बहुतांश प्रकरणांमध्ये प्रजननक्षमता परत येऊ शकते. पण दीर्घकाळ चुकीच्या पद्धतीने स्टिरॉईड्स वापरल्यास नुकसान कायमचे देखील होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता स्टिरॉईड्स घेणे टाळावे.