

ठाणे : बदलती जीवनशैली, तणावग्रस्त दिनचर्या आणि वाढती व्यसनाधीनता यामुळे महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणे कठीण जात आहे. परिणामी अनेक इच्छुक जोडपी वैद्यकीय सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाकडे -म्हणजेच आयव्हीएफ आणि आययूआय प्रक्रियेच्या दिशेने वळताना दिसत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनाने (डब्लूएचओ)च्या अहवालानुसार भारतातील दर 6 पैकी 1 जोडपं वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त आहे. आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. संदीप माने यांच्या मते, भारतीय महिलांमध्ये स्त्रीबीजसाठा युरोपियन महिलांच्या तुलनेत सरासरी 6 वर्षांनी लवकर कमी होतो. पूर्वी ही स्थिती 35 वयानंतर दिसत होती; मात्र आता 28 ते 30 वयाच्या महिलांमध्येही प्रजनन क्षमतेत घट दिसते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणार्या हार्मोनल अडचणी हे आहे.
पीसीओडी, थायरॉईड विकार, ट्युब ब्लॉकेज, किशोरवयीन टीबीमुळे गर्भाशयाला होणारे नुकसान, आंतरिक संसर्ग अशा कारणांमुळेही प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे वेळेत तपासणी व वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.राज्यातील काही सरकारी रुग्णालयांतून सध्या आययूआय प्रक्रिया मोफत केली जाते. कामा हॉस्पिटल व सायन रुग्णालयात यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. खासगी आयव्हीएफ प्रक्रियेसाठी एका सायकलसाठी किमान 1.5 लाख ते 4.5 लाख रुपये इतका खर्च येतो, तर सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रक्रिया मोफत उपलब्ध आहे.
महिलांप्रमाणे पुरुषांच्याही आरोग्यावर वंध्यत्वाचे संकट असते. बैठी जीवनशैली, शुकाणूंचा दर्जा खालावणे, सिगारेट, तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन, तसेच वाढलेला स्ट्रेस यामुळे पुरुषांमध्येही वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे.
महिलांमध्ये, थायरॉईड, पेल्व्हिक इन्फेक्शन, टीबीचा संसर्ग, गर्भाशयात अतिरिक्त पडदा इत्यादी अडथळ्यांमुळे गर्भधारणेची प्रक्रिया अवघड होते.
गर्भधारणा अडथळ्यांची प्रमुख कारणे
कामाचा ताण, मानसिक दबाव
स्त्रीबीज साठ्याची लवकर घट
पुरुषांमध्ये शुकाणूंची गुणवत्ता कमी
व्यसनाधीनता- दारू, तंबाखू, गुटखा
टीबी संसर्गामुळे अंतर्गत नुकसान
थायरॉईड व पीसीओडी
हार्मोनल अनियमितता
वयाची मर्यादा- 30 नंतर संधी घटतात
वय 20 ते 35 वयोगटात असेल तर नैसर्गिकरीत्या एक वर्षासाठी गर्भधारणा करण्याचा सल्ला दिला जातो. तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि 6 महिने नैसर्गिकरीत्या गर्भधारणेचा प्रयत्न करूनही गर्भधारणा होऊ शकत नसेल, तर शक्य तितक्या लवकर योग्य फर्टिलिटी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अनियमित मासिक पाळी, मेनोपॉजची स्थिती, मिसकॅरेंजेससारख्या समस्या किंवा पुरुषांमध्ये इरेक्शन- सारख्या इतर समस्या असतील, तर तत्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
सद्याच्या धकाधकीच्या युगात युवापिढीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. करिअरला महत्त्व देण्यात येत आहे. यामुळे लग्न उशिरा होत आहेत. याशिवाय चुकीचे नियोजन, पिझ्झा बर्गरपासून चुकीची आहार पद्धती आणि व्यसनाकडे झुकलेली पिढीमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. सुक्ष्म अभ्यासातून शंभर पैकी 12 ते 15 जणांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवत असल्याचे भयावह वास्तव पुढे आले असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
30 वयानंतर प्रजनन आरोग्य तपासणी नियमित करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे गर्भधारणेत अडथळा येत असल्यास, योग्य वेळेत निदान होऊन उपचार शक्य होतात. वेळेवर गर्भधारणा न झाल्यास आयव्हीएफ किंवा आययूआय प्रक्रियेकडे वळणे हा सुरक्षित पर्याय आहे.
डॉ. संदीप माने, आयव्हीएफ तज्ज्ञ, ठाणे