China plastic flowers| प्लास्टिक फुलांद्वारे वंध्यत्व पसरवण्याचा चीनचा डाव

‘टिटॅनियम डायऑक्साईड’चा वापर; नैसर्गिक फुलांची 2 हजार कोटींची उलाढालही ठप्प
China plastic flowers
प्लास्टिक फुलांद्वारे वंध्यत्व पसरवण्याचा चीनचा डाव
Published on
Updated on
हरिष पाटणे

सातारा : भारताचा शत्रू असणारा चीन हा देश व्यापारवाढीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. ‘टिटॅनियम डायऑक्साईड’सारखा विषारी गंध प्लास्टिक फुलांतून नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाऊन कॅन्सरसारखा दुर्धर आजार जडण्याचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांमध्ये टेस्टिस आणि महिलांच्या बीजांडात हे वायू पसरून वंध्यत्व येते. प्लास्टिक फुले, फुलांच्या माळा भारतात पाठवून देशाचा जनन दर घटवण्याचा कुटिल डाव चीनने आखला आहे, असा गौप्यस्फोट कोरेगावचे आ. महेश शिंदे यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या खास मुलाखतीत केला आहे. दरम्यान, कृत्रिम फुलांच्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्रातील नैसर्गिक फूलशेतीची दोन हजार कोटींची उलाढालही ठप्प झाल्याचा दावा आ. शिंदे यांनी केला आहे.

आ. महेश शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ना. भरत गोगावले, ना. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, पर्यावरण सचिव यांच्यासोबत 24 आमदार प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. सर्वोच्च न्यायालयात कोणीही आव्हान करू शकणार नाही, असा शासन आदेश लवकरच निघणार असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आ. महेश शिंदे म्हणाले, प्लास्टिक फुले ही रिसायकल होतात. त्यावर असलेला कृत्रिम रंग हा काही दिवसांतच उडून जाऊन तो हवेत पसरतो. ही फुले बनविण्यासाठी वापरलेले ‘मेटॅलिक ऑक्साईड’, ‘टेराटेरियल ऑक्साईड’ असे घातक वायू वातावरणात पसरून हा वायू लोकांच्या फुफ्फुसात जातो. छोटे छोटे धूलिकण इतके धोकादायक असतात की, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. बाजारात सहज उपलब्ध होणारी प्लास्टिकची फुले स्वस्तात मिळतात, म्हणून घरात आणली जातात. मात्र, या फुलांसोबत दुर्धर आजारही आपण घरात आणतोय, हेही विचारात घेतले पाहिजे.

प्लास्टिक फुले बंदीच्या मागणीपर्यंत येण्याचे कारण स्पष्ट करताना आ. शिंदे म्हणाले, अनेक गावांत कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. ज्याला कुठलेही व्यसन नाही, अशी 10 ते 15 वयाची मुलेदेखील कॅन्सरची शिकार झाली आहेत. नैसर्गिकरीत्या पिकवलेले अन्न खाल्ले तरीदेखील अनेकांना कॅन्सर जडला आहे. या परिस्थितीमध्ये कॅन्सरचे प्रमाण कशामुळे वाढले, याच्या मुळाशी जाण्याचा मी निर्णय घेतला, त्यातून घातक वास्तव समोर आले. प्लास्टिकची फुले सण, उत्सवांमध्ये वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या फुलांवर कृत्रिम रंग लावले जातात. सहा महिन्यांत हे रंग उडून जातात. फुलांना दिलेला पिवळा ‘झॅन्थिन’ रंग कॅन्सरला निमंत्रण देतो. ही फुले, पाने नैसर्गिक दिसावीत म्हणून त्याला वैशिष्ट्यपूर्ण असा रंग दिला जातो. हा रंग सहा महिन्यांत उडतो, त्याचा वायू घरभर पसरून नाकावाटे हा वायू फुफ्फुसांमध्ये जातो. घरातील वातावरणामध्ये तो पसरून फुफ्फुसे, टेस्टिस आणि ओव्हरीजमध्येही तो प्रवेश करून कॅन्सर, वंध्यत्व असे प्रकार समोर येतात. निर्माण झालेली ही विचित्र परिस्थिती बदलण्यासाठीच प्लास्टिक फुलांवर बंदीची मागणी मी केली, असे आ. शिंदे म्हणाले.

प्लास्टिक फुलांच्या वापरामुळे शेतकर्‍यांच्या फूलशेतीवरही गंडांतर आल्याचे स्पष्ट करत आ. महेश शिंदे म्हणाले, राज्याच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार, राज्यामध्ये 7 ते 8 वर्षांपूर्वी फूलशेतीची उलाढाल तब्बल 2,000 कोटी रुपये इतकी होती. कृत्रिम फुलांच्या वापरामुळे ही उलाढाल लक्षणीयरीत्या घटून फूलशेती करणारे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कृत्रिम फुलांची उलाढाल 1 हजार 200 कोटी रुपये इतकी वाढली आहे. नैसर्गिक फूलशेतीवर कृत्रिम फूल विक्रीने गंडांतर आणल्याचे कृषी विभागाच्या अहवालातूनच पुढे आले आहे. झेंडू, शेवंती, गुलाब, जरबेरा या फुलांचा गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या प्रमुख सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर्वी वापर होत होता. आता मात्र या फुलांच्या उत्पादनावरच कृत्रिम फुलांच्या विक्रीमुळे गंडांतर आले आहे. नैसर्गिक फुले काही काळाने सुकतात; मात्र कृत्रिम फुले वर्षानुवर्षे वापरता येत असल्याने ग्राहक ऐन सणासुदीत कृत्रिम फुले घरी आणून घातक रोगाला निमंत्रण देत आहेत. हे प्रमाण वाढत गेले तर पुढील पिढ्या अडचणीत येऊ शकतात, असेही ते म्हणाले.

उत्सवांतून पसरतोय कॅन्सर

आजकाल लग्न समारंभ, तसेच उत्सवांमध्ये प्लास्टिक फुले आणि फुला-पानांच्या माळांची सजावट मोठ्या प्रमाणावर केली जाते. लग्न समारंभात तर याच सजावटीजवळ नवरा-नवरी आठ ते दहा तास या कृत्रिम फुलांच्या सान्निध्यात असतात, त्यामुळे लग्न समारंभ, सण-उत्सव यात कृत्रिम फुलांचा होणारा वापर कॅन्सरला निमंत्रण देत आहे, असेही आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

भारताला बनवलेय ‘डस्टबिन’

अमेरिकेतून दररोज प्लास्टिकचे 70 कंटेनर भरून भारतात येतात. भारताला या देशाने प्लास्टिकचे ‘डस्टबिन’ बनवलेय, ही बाबही आ. महेश शिंदे यांनी अधोरेखित केली आहे.

अ‍ॅरोमा थेरिपी आवश्यक

नैसर्गिक फुलांमध्ये अ‍ॅरोमॅटिकल ऑईल असते. त्यांचा सुगंध घेतल्यानंतर मानसिक आरोग्य उत्तम राहते. अ‍ॅरोमा थेरिपीच्या उपयुक्ततेसाठी फूलशेतीला बळ द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

कृत्रिम फुलांच्या वापरामुळे नैसर्गिक फुलांची उलाढाल मोठ्या प्रमाणात घटली आहे. सरकारने महाराष्ट्रात प्लास्टिक फुलांच्या निर्मिती, विक्रीवर तत्काळ बंदी घालावी.
आ. महेश शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news