Latest

नगर : बनावट एटीएम कार्ड तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

अनुराधा कोरवी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपावर एटीएम कार्ड स्वॅप करून पैसे जमा करताना त्या कार्डाचे स्कॅनिंग करून डाटा चोरणे व त्याआधारे बनावट एटीएम कार्ड तयार करून नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अहमदनगर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी ठाणे येथून या आरोपीला अटक केली आहे. सुजित राजेंद्र सिंंग (रा. वसई-विरार, ठाणे, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे.

सीसीटीव्ही फुटेजवरून २ आरोपींना अटक

मे महिन्यात एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे वेगवेगळ्या एटीएममधून पैसे काढत एक लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अहमदनगर येथील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना एटीएम सेंटर येथील सीसीटीव्ही फुटेजवरून २ आरोपींना अटक करण्यात आली होती.

यानंतर धीरज अनिल मिश्रा व सुरज अनिल मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ३१ बनावट एटीएम कार्ड व २ लाख ६१ हजार ५०० रुपये हस्तगत करण्यात आले होते. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुजित राजेंद्र सिंग हा असल्याचे समोर आले. तेव्हापासून सुजित हा फरारी होता.

११ सप्टेंबर रोजी अहमदनगर सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना सुजित सिंग हा वसई येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार अहमदनगरच्या सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तेथे सापळा लावला.

या सापळ्यात सुजित सिंग अलगत अडकल्याने तेथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लॅपटॉप, ५ मोबाईल हँडसेट, एक संगणक, १७ पेन ड्राईव्ह, एटीएम कार्ड क्लोन करण्यासाठी वापरले जाणारे ४ स्कीमर मशीन, एक कलर प्रिंटर, ५४ बनावट एटीएम कार्ड, बनावट एटीएम कार्ड करण्यासाठी लागणारे ४६ कोरे कार्ड, ६ विविध कंपन्यांचे सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी सुजित राजेंद्र सिंग यांच्याविरोधात यापूर्वी अहमदाबाद, सुरत व मुंबई येथे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT