नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्यासाठी लागणारे रसायन सोलापूर येथील कारखान्यास पुरवणाऱ्या संशयितास अमली पदार्थविरोधी पथकाने केरळ राज्यातून ताब्यात घेतले आहे. मोहमंद अरजास एम. टी. (कोसीकोडा, केरळ) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.
सामनगाव येथे १२.५ एमडीसह गणेश शर्मा याला पकडल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यानुसार या गुन्ह्याशी संदर्भात असलेल्या १० हून अधिक संशयितांची ओळख पटवून त्यांची धरपकड केली. तसेच सोलापूर येथे एमडी तयार होत असल्याचे तपासात उघडकीस आणून तेथील कारखाना व गोदामावर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी परराज्यात तपासी पथके पाठवून संशयितांचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विराेधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड व गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने केरळ राज्यात सापळा रचून मोहमंद यास पकडले.
पोलिसांनी मोहमंदकडे केलेल्या सखोल तपासात त्याने बनावट कंपनीची नोंदणी करीत त्याआधारे जीएसटी क्रमांक मिळवला. तसेच हैदराबाद येथील कंपनीतून दोन ते अडीच हजार लिटर रसायन स्वत:च्या कंपनीसाठी घेतल्याचे भासवले. मात्र, हे रसायन त्याने सोलापूर येथील एमडी तयार करणाऱ्या कंपनीत पुरवल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी मोहमंदला अटक केली असून, त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.
संशयितांविरोधात मोक्का
तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्ह्यातील १५ संशयित आरोपींविरोधात मोक्कानुसार कारवाई केली आहे. यातील गणेश शर्मा, गोविंदा साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या चौधरी, सनी व सुमित पगारे, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा मोरे, मनोहर काळे, वैजनाथ हावळे, प्रथमेश मानकर हे सर्व जण मध्यवर्ती कारागृहात आहेत. उमेश व अमोल वाघ, अक्षय नाईकवाडे, भूषण मोरे या संशयितांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :