Rise Up : खेळात सातत्य राखल्यास यश मिळतेच : जान्हवी धारिवाल-बालन | पुढारी

Rise Up : खेळात सातत्य राखल्यास यश मिळतेच : जान्हवी धारिवाल-बालन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने केवळ महिलांसाठी अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ही मोठी कौतुकाची बाब आहे. प्रत्येक मुलीने या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन आपले करिअर करावे. खेळामध्ये यश-अपयश मिळत असते. मात्र, सरावाच्या माध्यमातून खेळात सातत्य राखल्यास नक्कीच यश मिळते, असे प्रतिपादन माणिकचंद ऑक्सिरिचच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन यांनी केले.

दै. ‘पुढारी’ आणि पूना डिस्ट्रिक्ट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. बाबूराव सणस क्रीडांगणावर या स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, असोसिएशनचे सचिव राजीव कुलकर्णी, दै. ‘पुढारी’च्या मार्केटिंगचे नॅशनल हेड आनंद दत्ता, निवासी संपादक सुनील माळी, मार्केटिंगचे पुणे युनिट प्रमुख संतोष धुमाळ, हरीश हिंगणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

धारिवाल म्हणाल्या, दै. ‘पुढारी’च्या वतीने केवळ महिलांसाठी सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याने अधिक आनंद झाला. हा स्तुत्य उपक्रम एकमेव माध्यम म्हणून दै. ‘पुढारी’कडून पुढाकार घेण्यात आला. महिला खेळाडूंना अशा प्रकारचे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देत केवळ शहरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून विविध शाळांमधून खेळाडू सहभागी झालेले आहेत. प्रत्येक खेळाडूने यश-अपयश याचा अधिक विचार न करता सरावामध्ये सातत्य राखणे आवश्यक असून, त्यानंतरच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो.
कसगावडे म्हणाले, दै. ‘पुढारी’च्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी मुलींचा मोठा सहभाग असून, ग्रामीण भागातील खेळाडू अधिक आहेत. स्पर्धांचे दै. पुढारीच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आलेले आहे. अशा स्पर्धांमधूनच खेळाडूंना स्वतःच्या कामगिरीचा दर्जा कळत असतो. दै. ‘पुढारी’चा हा उपक्रम इतरांना दिशादर्शक ठरत आहे. दै. ‘पुढारी’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने राईझ अप पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी सुरू झालेल्या व फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या राईझ अप या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सिझन 2 ची सुरुवात यावर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती आणि जलतरण स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. ‘पुढारी’ एकमेव माध्यम समूह आहे. या स्पर्धेचे संघटनेचे समन्वयक हर्षल निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

दै. ‘पुढारी’ने केवळ महिलांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धा भरवत खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. अशा स्पर्धांमधून खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचावे. दै. ‘पुढारी’च्या वतीने उत्तम नियोजन असल्याने ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर खेळाडू सहभागी झालेले आहेत. राज्य, राष्ट्रीय पातळीवर पोहचणार्‍या खेळाडूंच्या पाठीशी पुणे महापालिका नेहमीच उभी राहील. तसेच दै. ‘पुढारी’च्या या स्तुत्य उपक्रमाला खूप शुभेच्छा.

– विकास ढाकणे
(अतिरिक्त आयुक्त,
पुणे महानगरपालिका)

हेही वाचा

अवकाळी पाऊस : राज्यात एक लाख हेक्टरचे नुकसान

सावधान..! महाराष्ट्रात ‘झिका’ पाय पसरतोय

इडीचा त्रास होऊ नये म्हणून आमचे काही सहकारी भाजपकडे गेले : अनिल देशमुख

Back to top button