T20 WC : टी-20 वर्ल्डकपसाठी रोहितच कर्णधार हवा : झहीर खान | पुढारी

T20 WC : टी-20 वर्ल्डकपसाठी रोहितच कर्णधार हवा : झहीर खान

मुंबई, वृत्तसंस्था : 2024 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकात देखील भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्याच खांद्यावर असायला हवी, असे झहीर खानने म्हटले आहे. तो क्रिकबझशी बोलत होता. रोहित शर्मा सध्याच्या संघासोबत चांगला जोडला गेला आहे, त्याच्याकडे फारसा अनुभव आहे. दबावाची स्थिती कशी हाताळायची हे त्याला माहीत आहे. त्यामुळे मला वाटते की, रोहित कर्णधार म्हणून योग्य आहे, असेही तो म्हणाला. (T20 WC)

तब्बल 13 वर्षांनंतर यंदा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपेल, अशी आशा तमाम भारतीयांना होती. मात्र, वन डे विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला अन् भारत किताबापासून एक पाऊल दूर राहिला. विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन होण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव विसरून भारतीय संघाने आता पुढील वर्षी होणार्‍या ट्वेंटी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या काही ट्वेंटी-20 मालिकेत संघाचा भाग नसल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली. आगामी ट्वेंटी-20 विश्वचषकात हार्दिक भारतीय संघाची धुरा सांभाळू शकतो, असे मानले जात आहे. मात्र, झहीर खानने हे विधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले. (T20 WC )

झहीर खानने आणखी सांगितले की, आता ट्वेंटी-20 विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त सहा महिने उरले आहेत. दरम्यान, आयपीएल सारखी मोठी स्पर्धा होणार आहे, ज्यामुळे तयारी मजबूत होण्यास खूप मदत होईल. अशा परिस्थितीत रोहित शर्मा की हार्दिक पंड्या हा मुद्दा उपस्थित होईल; पण रोहितने संघाचे नेतृत्त्व केलेले अधिक फायद्याचे ठरेल. हार्दिकच्या पुनर्वसनावर आणि पुनरागमनावरही बर्‍याच बाबी अवलंबून असतील.

हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी

हार्दिक पंड्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-20 क्रिकेटच्या सहा सामन्यांत भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. या सहा सामन्यांपैकी हार्दिकने टीम इंडियाला 5 सामन्यांत विजय मिळवून दिला, तर एक सामना बरोबरीत संपला. म्हणजेच ट्वेंटी-20 मध्ये कर्णधार म्हणून हार्दिकने एकाही सामन्यात पराभवाची चव चाखलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिकने एकूण 11 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 8 सामन्यांत संघाने विजय मिळवला आहे, तर 2 सामने भारताला गमवावे लागले.

हेही वाचा :

Back to top button