पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी सध्या भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी वांग यी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. भेटीदरम्यान वांग यी यांनी अजित डोवाल यांच्याशी १ तास चर्चा केली आहे. अजित डोवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, लडाखच्या उर्वरित भागांतूनही सैन्य हटवले जात नाही, तोपर्यंत द्विपक्षीय संबंध सुधारणार नाहीत. सीमा भागांत शांतता राहिली तर परस्पर विश्वास वाढेल. सध्याची परिस्थिती दोन्ही देशांच्या हिताची नाही.
भारताने सीमेलगत शांतता रहावी यासाठी राजकीय आणि सैनिकी स्तरावर चर्चा सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे. अजित डोवाल म्हणाले की, दोन्ही देशांकडून परस्पर सुरक्षेच्या संकेतांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. एका दिशेने चर्चा सुरू ठेवत सर्व संबंध सुधारावेत. २०२० मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर सर्वोच्च स्तरावरील ही पहिलीच चर्चा पार पडत आहे.
चर्चा पुढे नेण्यासाठी अजित डोवाल यांना चीनचा दौरा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. चीनने आमंत्रित केल्यानंतर डोवाल यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. अनेक मुद्दे निकाली करण्यासाठी मी चीन दौरा करणार असल्याचे अजित डोवाल म्हणाले आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी गुरूवारी दिल्लीत पोहचले होते.
वांग यी यांच्या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमध्ये कोरोनानंतर प्रत्यक्ष बातचीत करण्याचा होता. वांग यी हे नरेंद्र मोदी यांना या वर्षी होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या बीजींग येथील बैठीकीचे आमंत्रण देणार आहेत. एस. जयशंकर यांनी चीनीच्या परराष्ट्रमंत्र्यांशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. 'वांग यी यांचे हैद्राबाद हाऊस मध्ये स्वागत आहे' असे ट्वीटही एस जयशंकर यांनी केले होते.