CSK vs DC : चेन्नईपुढे दिल्लीचे लोटांगण www.pudhari.news 
Latest

CSK vs DC : चेन्नईपुढे दिल्लीचे लोटांगण

backup backup

मुंबई ः वृत्तसंस्था महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने रविवारच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी प्रचंड विजय मिळवून आपल्या चौथ्या शानदार विजयाची नोंद केली. त्यामुळे आता चेन्नईचे अकरा सामन्यांतून आठ गुण झाले असून दिल्लीला अकरा सामन्यांतून दहा गुणांवर समाधान मानावे लागले आहे.

चेन्नईने दिल्लीपुढे विजयासाठी 209 धावांचे प्रचंड लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य दिल्लीला अजिबात पेलवले नाही. त्यांचा सगळा संघ 17.4 षटकांत 117 धावा करून गारद झाला. त्यांचा भरवशाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने 19 धावा केलेल्या असताना त्याला माहीश तिक्षानाने पायचीत पकडले. श्रीकर भरत हाही 8 धावा करून बाद झाला. त्याला सिमरजीतसिंगने मोईन अलीकरवी झेलबाद केले.

त्यानंतर मिशेल मार्श आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी तुफानी फटकेबाजी करून धावफलक हलता ठेवला. मात्र, त्यानंतर ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले. त्यांनी हाराकिरी केली आणि त्यामुळे चेन्नईचा विजय सुकर झाला. चेन्नईकडून मोईन अली सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.

तसेच मुकेश चौधरी, सिमरजितसिंग, ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. माहीश तिक्षानाने एक मोहरा टिपला. दिल्लीकडून पंतने 21, मिशेल मार्शने 25, रोव्हमन पॉवेलने 3, रिपल पटेलने 6, अक्षर पटेलने 1, शार्दूल ठाकूरने 21, कुलदीप यादवने 5 तर खलील अहमदला भोपळाही फोडता आला नाही. त्याआधी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईने धडाक्यात सुरुवात करताना 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 208 धावांचा डोंगर उभारला.

सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने 33 चेंडूंत 41 धावा कुटल्या. डेव्हॉन कॉन्वेसोबत त्याची जोडी छान जमली होती. या दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजीची पिसे काढताना प्रतिषटक दहा धावांची गती राखली. बहरात येत असतानाच एन्रिच नोर्टजेने गायकवाडला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. दोन्ही सलामीवीरांनी 110 धावांची भक्कम पायाभरणी केली. ऋतुराजने 4 चौकार आणि 1 षटकार खेचला. तो बाद झाल्यानंतर त्याची जागा शिवम दुबेने घेतली. दुसर्‍या बाजूने कॉन्वेचा हल्लाबोल सुरूच होता. पंतने चेन्नईला रोखण्यासाठी सहा गोलंदाज वापरून पाहिले. पण, त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरताना दिसले.

कॉन्वेला शतकाने मात्र हूल दिली. 87 धावांची सर्वांगसुंदर खेळी करून तो खलील अहमदच्या मार्‍यावर पंतकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने 49 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. सतराव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर कॉन्वे बाद झाला. त्याला आयपीएल महालिलावात चेन्नईने 50 लाख या त्याच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले होते. शिवम दुबे हाही 32 धावांची चटपटीत खेळी करून बाद झाला. 19 चेंडूंचा सामना करताना त्याने 2 चौकार व 2 उत्तुंग षटकार हाणले. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला.

दुसर्‍याच चेंडूवर त्याने मिशेल मार्शला षटकार आणि चौकार ठोकला. अंबाती रायडू मात्र केवळ 5 धावा करून बाद झाला. मग मोईन अली मैदानात उतरला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. धोनीने 8 चेंडूंत नाबाद 21 धावा झोडल्या. रॉबिन उथप्पा भोपळाही न फोडता बाद झाला. दिल्लीकडून एन्रिच नोर्टजेने 3, खलील अहमदने 2 तर मिशेल मार्शने 1 गडी टिपला. कुलदीप यादवने 3 षटकांत 43 धावा मोजल्या.

धोनीच्या नेतृत्वाची किमया

महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजा याच्याकडून नेतृत्वाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने जणू कातच टाकली आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्यांची कामगिरी उंचावत चालली आहे. रविवारच्या लढतीत चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत अफलातून कामगिरी बजावली. जगातील अव्वल कर्णधारांमध्ये गणना झालेल्या चाणाक्ष धोनीने सुरुवातीपासून संघाचे सुकाणू हाती घेतले असते तर चेन्नईचा संघ आज प्ले ऑफच्या शर्यतीत असता, अशी चर्चा चेन्नईच्या चाहत्यांत रंगली आहे.

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT