धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही : उद्धव ठाकरे | पुढारी

धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही : उद्धव ठाकरे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : धर्मवीर आनंद दिघे यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी धर्मवीरांच्या आठवणी जागवल्या.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दिघेंची भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक, निर्माता, अभिनेता मंगेश देसाई, ठाण्याचे पालकमंत्री आणि या चित्रपटाचे प्रवर्तक एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान आदींची उपस्थिती होती. उद्धव आपल्या भाषणात म्हणाले, मी आनंद दिघे साहेबांसोबत एका दौर्‍यावर गेलो होतो. त्यावेळी मी पाहिले होते ते काम करताना तहानभूक विसरुन काम करत असत.

प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या सारखे काम करावे. ते प्रत्येकाला प्रेमाने व आपुलकीने जवळ करत. असा नेता पुन्हा होणे नाही. ज्या वेळी ते गेले त्यावेळी त्यांचे वयं पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले. चोवीस तास ते कामाला वाहिलेले होते. त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी ‘धर्मवीर’ पाहावा लागेल.

Back to top button