नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
दिल्ली दंगलीचा प्रमुख आरोपी शरजिल इमाम याच्याविरोधात देशद्रोह, गैरकृत्य प्रतिबंधक कायदा (युएपीए) तसेच अन्य कलमे लावण्यात यावीत, असे निर्देश अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती अमिताभ रावत यांनी सोमवारी दिले. सीएए-एनआरसी कायद्याला विरोध करीत शरजिल याने दिल्ली, अलिगडसहित देशाच्या विविध भागात प्रक्षोभक भाषणे दिली होती.
डिसेंबर 2019 मध्ये दिलेल्या भाषणासाठी शरजिलला खटल्याचा सामना करावा लागेल, असे न्यायालयाने आजच्या सुनावणीवेळी स्पष्ट केले. त्याच्याविरोधात देशद्रोहाचे कलम 124 ए, गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यातील कलम 13 तसेच 153 ए, 153 बी आणि 505 ही कलमे लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
आसामला देशाच्या इतर भागाशी जोडणाऱ्या भूभागाला (चिकेन नेक) तोडण्यात यावे, अशी चिथावणी शरजिलने दिली होती. यानंतर शरजिलविरोधात दिल्ली पोलिसांनी यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अलिगड मुस्लिम विद्यापीठात जानेवारी 2020 मध्ये दिलेल्या भाषणानंतर त्याच्याविरोधात पाच ठिकाणी देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले होते.
यात दिल्ली, आसाम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर यांचा समावेश होता. यानंतर शरजिलला बिहारमधून अटक करण्यात आली होती. बिहारच्या जेहानाबादचा मूळ रहिवासी असलेल्या शरजिलने मुंबई आयआयटीमध्ये एमटेक केल्यानंतर दिल्लीच्या जेएनयुमध्ये शिक्षण घेतले होते.
हेही वाचलत का?