budget 2022 expectations : केंद्रीय अर्थसंकल्पात याही वर्षी उद्योगांना बूस्टर डोस ? | पुढारी

budget 2022 expectations : केंद्रीय अर्थसंकल्पात याही वर्षी उद्योगांना बूस्टर डोस ?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा 
मोदी 2 सरकारचा चौथा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होत असून अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सोमवारी अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली. (budget 2022 expectations) अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून कुणाला काय-काय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन विविध उद्योगांसाठी याहीवेळी मदतीचा हात दिला जाण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयकराची मर्यादा वाढविली जाणार काय, यावर सर्वसामान्यांची नजर राहील.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गतवर्षी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बूस्टर अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी काहीसा तसाच अर्थसंकल्प राहण्याचा अंदाज आहे. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन सादर करीत असलेला हा चौथा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पावर अंतिम हात फिरविण्यात जे वरिष्ठ अधिकारी सामील आहेत, त्यात देवाशीष पांडा, टी. व्ही. सोमनाथन, तरूण बजाज, अजय सेठ, तुहीनकांत पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.  (budget 2022 expectations)
देबाशीष पांडा हे अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव आहेत. अर्थसंकल्पातील वित्तीय क्षेत्राशी सर्व घोषणांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पांडा हे 1987 च्या उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. देशाच्या वित्तीय स्थिरतेसाठी रिझर्व्ह बँकेच्या मदतीने काम करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. बॅड बँक आणि विकास वित्त संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. सोमनाथन हे खर्च विभागाचे सचिव आहेत.
जागतिक बँकेत काम केलेल्या सोमनाथन यांनी पंतप्रधान कार्यालयात संयुक्‍त सचिव म्हणूनही सेवा दिलेली आहे. तरुण बजाज अर्थ मंत्रालयात महसूल सचिव आहेत. ते 1988 च्या हरियाणा केडरचे अधिकारी आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी जे पॅकेज देण्यात आले होते, ते तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. तुहीनकांत पांडे हे गुंतवणूक तसेच सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव आहेत. एअर इंडियाच्या खाजगीकरणात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. अजय सेठ हे गतवर्षीच्या एप्रिलमध्ये आर्थिक घडामोडीविषयक खात्याचे सचिव बनले होते. अर्थसंकल्प बनविण्यात त्यांची भूमिका देखील महत्वाची आहे.
हे ही वाचलं का ?

Back to top button