पुढारी ऑनलाईन डेस्क : बुली बाई अॅप ( Bulli Bai Case ) प्रकरणातील संशयित आरोपी विशाल झा, श्वेता सिंग आणि मयांक रावत यांनी मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर नीरजकुमार सिंग आणि ओमकारेश्वर ठाकूर यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तर अन्य आरोपी नीरज बिश्नोई याने तांत्रीक कारणामुळे आपला जामीन अर्ज मागे घेतला.
बुली बाई अॅपच्या माध्यमातून मुस्लिम समुदायातील महिलांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन त्यांची बोली लावली जात होती. हा प्रकार उघडकीस येताच दिल्ली आणि मुंबई सायबर सेल पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करत या प्रकरणाती संशयितांना अटक केली होती.
नीरज बिश्नोई, नीरजकुमार सिंग आणि ओमकारेश्वर ठाकूर यांनी ॲपची निर्मिती केली. तसेच यांनी आपला उद्देश साध्य करण्यासाठी या प्रकरणातील संशयित आरोपी विशाल झा, श्वेता सिंग आणि मयांक रावत यांच्या अपरिपक्तेचा फायदा घेतला आहे. त्यामुळे नीरजकुमार सिंग आणि ओमकारेश्वर ठाकूर यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. नीरज बिश्नोई याने व त्याच्या वकिलाने जामीन अर्जावर सही केली नव्हती. त्यामुळे त्याने आपला जामीन अर्ज यावेळी मागे घेतला.
संशयित आरोपी विशाल झा, श्वेता सिंग आणि मयांक रावत हे विद्यार्थी आहेत. त्यांना परीक्षा देण्यासाठी जामीन मंजूर केला जात आहे. त्यांना आता बंदिस्त ठेवले तर त्यांच्या भविष्यावर परिणाम होईल. संशयित आरोपीला जामीन मिळणे हा नियम आहे. तर जेल हा अपवाद आहे, असे स्पष्ट करत पुराव्याशी छेडछाड करु नये, देश सोडून जावू नयेत तसेच साक्षीदारांच्या संपर्कात राहू नये या अटींचे पालन करण्याचे आदेश देत न्यायालयाने विशाल झा, श्वेता सिंग आणि मयांक रावत या तिघांना २५ हजार रुपयांच्या
व्यक्तिगत जातमचुकल्यावर जामीन मंजूर केला.
बंगळूर येथून विशाल झा तर उत्तराखंड येथून श्वेता सिंगला अटक केल्यानंतर इंजिनीअर असलेल्या मयांक रावत याला सायबर पोलिसांनी अटक केली होती. 'बुल्लीबाई अॅप' शी संबंधित तीन अकाऊंट श्वेता सिंग हाताळत असल्याचे तपासातून उघड झाले होते. याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीतील पोलिस ठाण्यांत १ जानेवारी २०२२ रोजी गुन्हे नोंदवण्यात आले होते. धार्मिक आधारावर दोन समुदायांतील भेदभाव वाढविणे, जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे, पाठलाग करणे, विनयभंग, अब्रूनुकसानी तसेच आयटी कायद्यानुसार मुंबई पोलिसांनी हे प्रकरण दाखल केले होते.
हेही वाचा :