कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल होताच पोलिसांचे पथक त्यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी गिरगाव न्यायालयात याबाबतचा अर्ज सादर केला. याला न्यायालयाने मंजूरी दिल्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूर पोलिसांचे पथक ऑर्थर रोड जेलकडे रवाना झाले. याठिकाणी ॲड. सदावर्ते यांना ताब्यात घेवून पथक मध्यरात्री कोल्हापुरात पोहोचण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्तेंविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले होते. मंगळवारी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
बुधवारी दुपारी गिरगाव न्यायालयात कोल्हापूर पोलीसांचा अर्ज मंजूर झाला. यानंतर पोलिसांचे पथक ॲड. सदावर्तेला ताब्यात घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलकडे रवाना झाले. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांचे पथक ॲड. सदावर्ते यांना घेवून मध्यरात्री कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरुन मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकविणे तसेच चिथावणीखोर वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण केल्या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी २७ जून २०१९ रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या निकालाविरुध्द नापसंती दर्शवली होती. त्यांच्या निर्णयावर शंका घेऊन निकाल देणारे न्या. रणजित मोरे हे मराठा जातीचे आहेत, असे म्हणून त्यांची जात काढून, मराठे हे शुद्र आहेत, अशी भाषा वापरली होती. न्या. रणजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ऐकून त्यांच्या दबावाखाली मराठा समाजाच्या बाजूने सेटींग-बेटींग करुन निकाल दिला आहे, असाही आरोप सदावर्ते यांनी केला होता.
हे ही वाचलं का ?