"पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा"; लासलगावी महिला आक्रमक | पुढारी

"पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा"; लासलगावी महिला आक्रमक

नाशिक (लासलगाव) वार्ताहर : शहराला गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने लासलगाव ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा जगताप, संगीता पाटील, ज्योती निकम, आश्विनी बर्डे, दत्ता पाटील, अमोल थॊरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायतीचा निषेध केला.

“कोण म्हणत देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही”, ” पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा, “सत्ताधाऱ्यांनो जागे व्हा गावकऱ्यांना पाणी द्या” अश्या आवेशपूर्ण घोषणांसह परिसर चांगलाच दणाणून गेला.

गेल्या १५ दिवसांपासून सर्व प्रभागामध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे जनता वेठीस धरली जात आहे. लासलगाव येथे १६ गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाईप लाईन फुटली आहे / लाईट नाही असे शुल्लक कारण देऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे.

पाणी प्रश्नाविषयी विचारपूस केल्यास महिलांना तसेच नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे ग्रामपंचायत कार्यालयातून दिली जातात. तरी जो पर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत गावातील जनतेला टँकर मार्फत पाणीपुरवठा करण्यात यावा. १६ गाव पाणी पुरवठेची नवीन पाईप लाईन होण्यासाठी केंद्र सरकारकडून ८.५ कोटी व राज्य सरकारकडून ८.५ कोटी रुपये असे एकुण १७ कोटी रुपये मंजूर झालेले असून आतापर्यंत त्याचे काम सुरु झालेले नाही तरी गावकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता त्या पाईप लाईनची लवकरात लवकर डागडुजी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच एक दिवस आड पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सुवर्णा जगताप, संगीता पाटील, ज्योती निकम आदीं महिलांनी केली आहे.

हंडा मोर्चाला अहिल्यादेवी चौकातून सुरवात झाली. पुढे ग्रामपालिका कार्यालयात सर्कल अधिकारी यांना निवेदन देत सांगता झाली. यावेळी जि. प. सदस्य डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, प्रकाश दायमा, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील, दत्ता पाटील, अमोल थॊरे, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, माई पाटील, योगिता शिंदे, योगिता झांबरे, अश्विनी बर्डे, रुपाली केदारे, माधुरी लचके, सोनी कर्डीले, सुनीता थॊरे, शोभा कर्पे, रंजना शिंदे, कविता लोहारकर, अश्विनी पाटील, राजेंद्र चाफेकर, मनीष चोपडा, भानुदास बकरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button