अमोल मिटकरी : ‘एसटी कर्मचाऱ्यांकडून कमावलेला पैसा सांगलीत आला आहे का हे पाहावं लागेल’ | पुढारी

अमोल मिटकरी : 'एसटी कर्मचाऱ्यांकडून कमावलेला पैसा सांगलीत आला आहे का हे पाहावं लागेल'

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : गुणरत्न सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्याबरोबर सांगली जिल्ह्यातील दोन पट्टे होते. त्यांच्याद्वारे एस. टी. कर्मचाऱ्यांकडून कमावलेला कमिशनचा पैसा सांगली जिल्ह्यात आला आहे का ? हे आता बघावे लागेल, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांचे नांव न घेता आज येथे केला.

जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवा नेते प्रतिक पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर आदी उपस्थित होते.

मिटकरी म्हणाले की, कडकनाथ कोंबड्या कोठे गेल्या माहीत नाही ? ९० हजाराचे मंगळसूत्र कोठे चोरले ? कोठे आहे? हेही माहीत नाही, असा टोलाही त्यांनी पडळकर आणि खोत यांना लगावला. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे हिमालयात जाणार होते. ते गेले की नाहीत माहीत नाही, अशीही खिल्ली त्यांनी उडवली. बाबासाहेब पुरंदरे यांनी विकृत इतिहास लिहिला आहे. प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे नाव पुरंदरे यांनी चोरून बाबासाहेब हे नाव लावले. लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून प्रसिद्धी मिळवली. पुरंदरे हे शिवशाहीर नव्हते, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button