Latest

अकोला विधान परिषद मतदारसंघात वसंत फुलला; भाजपचे खंडेलवाल यांचा ११० मतांनी विजय

निलेश पोतदार

अकोला; पुढारी वृत्तसेवा

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीत अकोला, बुलडाणा, वाशीम मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली. त्यांना 441 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना 331 एवढी मते मिळाली. खंडेलवाल यांच्या विजयाने व-हाडात वसंत फुलल्याची चर्चा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी पाच टेबलावर घेण्यात आली. प्रत्येक टेबलावर पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच सकाळी ७ वाजल्‍यापासून मतमोजणी केंद्रावर महाविकास आघाडी तसेच भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयातील तिन्ही मतदारसंघातील 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदान केले.

बाजोरिया पुन्हा चमत्कार दाखवतात की खंडेलवाल त्यांची विजयी घोडदौड थांबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयातील 22 मतदान केंद्रातून मतपेट्या निवडणुकीच्या दिवशी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. अखेर निकालाचा दिवस उजाडला. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली.

यात तिन्ही जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी सहभाग घेतला. सोशल मीडियावर दोन्ही पक्षाकडून आपलाच विजय नक्की अशाप्रकारच्या पोस्ट फिरत होत्या. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य या नात्याने गेली अठरा वर्षे गोपीकिसन बाजोरिया या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे समीकरण बदलले. त्यामुळे भाजपने उद्योगपती वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बाजोरिया आणि खंडेलवाल यांच्यात तुल्यबळ लढत झाली. यावेळी निवडणूक निरिक्षक डॉ. दिलिप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

हे वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT