बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचा विकास व्हायचा असेल तर अध्यात्म, समाजकारण, राजकारण हे आवश्यक आहेच. ज्या समाजामध्ये एकी नांदते तिथे विकासाची नांदी होते. कर्नाटकात 70 लाखाहून अधिक मराठा समाज आहे. हा समाज सध्यस्थितीत विखुरलेला आहे. हा समाज एकत्र आला तर पुन्हा नक्कीच इतिहास घडेल, असे मत बंगळूर येथील ऐतिहासिक गोसाई मठाचे मठाधीश मंजुनाथभारती स्वामी यांनी व्यक्त केले.
येथील सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी वडगाव येथील आदर्श विद्या मंदिर पटांगणावर हजारो मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीत मराठा समाज मेळावा व मंजुनाथभारती स्वामींचा सन्मान सोहळा झाला. या कार्यक्रमात स्वामी बोलत होते. नूल (ता. गडहिंग्लज) येथील रामनाथ गिरी समाधी मठाचे भगवानगिरी महाराज, काशी येथील परमार्थ साधक संघाचे स्वामी सोहम चैतन्यपुरु वेदांताचार्य महाराज, रुद्र केसरी मठाचे हरिगुरु महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी गुरुवंदना कार्यक्रमाचे संयोजक रणजित चव्हाण-पाटील होते.
व्यासपीठावर बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके, खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर, निपाणीचे श्रीमंत दादाराजे निपाणीकर-सरकार, मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुतीराव मुळे, क्षत्रिय मराठा परिषदेचे शामसुंदर गायकवाड, गुरुवंदना कार्यक्रमाचे संयोजक किरण जाधव, रमाकांत कोंडूसकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, माजी महापौर शिवाजी सुंठकर होते.
मंजुनाथभारती स्वामी म्हणाले, भारतमाता ही पुण्यभूमी आहे. या देशाला प्राचीन काळापासून भौतिक व आध्यात्मिक वैभव फार मोठे लाभले आहे. अध्यात्मिक ज्ञानाने हा नटलेला देश आहे. छत्रपती शिवरायांसारख्या महापुरूषांच्या कर्तृत्वाने ही भूमी पावन झाली आहे. स्वामी विवेकानंदांसारखे वीरपुरुष या भूमीत जन्माला आले, याचा आम्हाला अभिमान आहे. क्षत्रिय समाज म्हणजे दुःखातून सुखाकडे नेण्याची प्रवृत्ती असणारा समाज आहे.
आ. अनिल बेनके म्हणाले, मराठा समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबध्द आहे. सध्या मराठा महामंडळाला 50 कोटी निधी मिळाला आहे. आ. श्रीमंत पाटील, आ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सरकारकडे पाठपुरावा करुन आणखी 100 काटी निधी मिळवून देणार आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षणाबाबत विधानसभेत आवाज उठवला आहे. मराठा समाजाचा 2 ए वर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी गरज पडल्यास पुन्हा आंदोलन करु. रमाकांत कोंडूसकर म्हणाले, मराठा समाजावर होणार्या अन्यायाविरोधात सर्वांनी पेटून उठले पाहिजे. पुढील काळात मराठ्यांची ताकद काय आहे, हे दाखवून देऊ.
किरण जाधव म्हणाले, आमची जागृती सुरुच ठेवून मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू. मारुती मोळे, रणजित चव्हाण-पाटील यांचेही भाषण झाले. प्रथम दत्ता जाधव, सुनील जाधव, मोहन पाटील या दांपत्यांच्या हस्ते स्वामींची पाद्यपूजा करण्यात आली. सूत्रसंचालन महादेव पाटील, अनंत लाड यानी केले. सागर पाटील यांनी आभार मानले.
मराठा समाजाला मंत्रिमंडळात स्थान स्थान नसल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे खंत व्यक्त केल्याचे मंजुनाथभारती स्वामी यांनी सांगितले. कर्नाटकात 70 लाखाहून अधिक मराठा समाजाचे लोक आहेत. मात्र कर्नाटकमधील भाजप सरकारचे दुर्लक्ष असल्याने मी स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारले असता आगामी काळात मराठी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व नक्की देऊ असे, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे स्वामी म्हणाले.
जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडत निघालेल्या शोभायात्रेतून मराठी संस्कृती अन् इतिहासाचे दर्शन घडले. मराठमोळ्या वेशभूषेत युवक- युवतींसह महिला सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजूला भगवे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे परिसर भगवेमय झाला होता. शोभायात्रेत सहभागी दोन रथ, एक हत्ती, चार घोडे आकर्षण ठरले.
नांदणी (ता. शिरोळ) येथील मठाच्या हत्तीवरुन शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार विजयनगर येथील गणेश होसूरकर तसेच जिजाऊंच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार मुक्ता कोंडूसकर (गांधीनगर), अश्विनी चौगुले, श्रृती मुंगारी, गार्गी जाधव (गांधीनगर) यांनी लक्ष वेधून घेतले.
दुपारी 12 वा. शिवाजी उद्यानात मंजुनाथभारती स्वामी, आ. अनिल बेनके, आ. अंजली निंबाळकर, आ. श्रीमंत पाटील, कर्नाटक क्षत्रिय परिषद महिला विभागाच्या खानापूर तालुका अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत, किरण जाधव, रमाकांत कोंडूसकर यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याला अभिषेक करूनपूजन झाले. त्यानंतर शोभायात्रा सुरु झाली. वडगावातील विठ्ठल मंदिर भजनी मंडळाने टाळ-मृदंगाच्या गजरात मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले. कागल येथील सुनीलराज नागराळे यांच्या हलगी पथक व तुतारी वादकांनी वाहव्वा मिळवली.
एका रथात मंजुनाथभारती स्वामी तर दुसर्या रथात स्वामी सोहम चैतन्यपुरी वेदांताचार्य महाराज (काशी) व भगवानगिरी महाराज (नूल) यांचा सहभाग होता. शिवमुद्रा ढोलपथकातील 70 सदस्यांनी ढोल वादनाने परिसर दणाणून सोडला. शोभा यात्रेत जायंट्स सखीतर्फे सुमारे दोन हजार जणांना नाश्ता व सरबत वाटप करण्यात आले. यासाठी अध्यक्षा चंद्रा चोपडे, विद्या सरनोबत, सविता मोरे, ज्योती अनगोळकर, नीता पाटील, वैशाली भातकांडे यांच्यासह अशोक हलगेकर व अन्य पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले. हुतात्मा बाबू काकेरु चौक येथे शिवप्रेमी युवक मंडळाने तोफेद्वारे शोभायात्रेला सलामी दिली व फुलांची उधळण केली.
शोभायात्रेत सहभागी झालेल्या भजनी मंडळात आ. अंजली निंबाळकर यांनीही सहभाग घेऊन भजनाच्या तालावर ठेका धरला. डॉ. सोनाली सरनोबतही हातात भगवा ध्वज घेऊन सहभागी झाल्या होत्या. आ. श्रीमंत पाटील, आ. अनिल बेनके आदी मान्यवरही सहभागी झाले होते.
हेही वाचलंत का?
आ. बेनके, आ. निंबाळकर यांना आवाहन करत मंजुनाथभारती स्वामी यांनी राज्याच्या शालेय पाठ्यपुस्तकात भगवद्गीता हा विषय समाविष्ट करण्याची गरज आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आपणही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी करावी, असे सांगितले. आपले न्याय्य हक्क मिळवायचे असतील, तर मराठा समाजाने एकत्रित येण्याशिवाय पर्याय नाही. आर्थिक, शैक्षणिक तसेच व्यापार-उदिम क्षेत्रातही मराठा समाज मागासलेला आहे. या सर्व क्षेत्रात पुढे येण्यासाठी यापुढे संघटित लढा द्यावाच लागेल. त्याची गुरूवंदना ही सुरूवात म्हणायला हरकत नाही.
– श्रीमंत पाटील, माजी मंत्री व आमदार, कागवाड