खते, बियाणातील गैरप्रकार रोखण्यासाठी १२ भरारी पथके | पुढारी

खते, बियाणातील गैरप्रकार रोखण्यासाठी १२ भरारी पथके

सातारा : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेचा कृषि विभाग सज्ज झाला आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी 3 लाख 82 हजार सर्वसाधारण क्षेत्र आहे. खते बी, बियाणे, औषधांचा गैरप्रकार रोखण्यासाठी 12 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील भात 49 हजार 100 हेक्टर, बाजरी 64 हजार हेक्टर, नाचणी 5 हजार 900 हेक्टर, मका 18 हजार 600 हेक्टर, तूर 1 हजार 900 हेक्टर, मूग 8 हजार 200 हेक्टर, उडीद 3 हजार 900 हेक्टर, भूईमूग 38 हजार 200 हेक्टर, सोयाबीन 63 हजार 700 हेक्टर, ऊस 65 हजार 300 हेक्टर, ज्वारी 24 हजार 200 असे मिळून सुमारे 3 लाख 82 हजार सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाच्या कृषि विभागासह जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने नियोजन सुरु केले आहे. शेतकर्‍यांनी जमिनीमध्ये योग्य ओलावा असल्याशिवाय पेरणी करु नये. हंगामासाठी 1 लाख 23 हजार मे टन खत मंजूर झाले असून 36 हजार 182 मे. टन खत शिल्लक आहे. खताच्या संरक्षीत साठ्यामध्ये 1 हजार 800 मे. टन युरिया तर 52 मे टन डीएपी खत आहे. 45 हजार 904 क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागणार असून महाबीजकडे 8 हजार 748 क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. तर 37 हजार 156 क्विंटल बियाणांची मागणी खाजगी कंपन्याकडे करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी खते व बियाणांची छापील किंमत बघून खरेदी करावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी खताचा वापर करताना बारामती कृषि विज्ञान केंद्र यांचे कृषक अ‍ॅपचा वापर करुन योग्य खत मात्रा शेतीला द्यावी. कृषि विभागाने खत किती उपलब्ध आहे हे शेतकर्‍यांना माहिती होण्यासाठी ब्लॉक तयार केला आहे. हा ब्लॉक शेतकर्‍यांच्या मोबाईलवर उघडून पाहिल्यास जिल्ह्यातील प्रत्येक कृषि सेवा केंद्रामध्ये किती युरिया खत शिल्लक आहे याची माहिती घरबसल्या शेतकर्‍यांना कळणार आहे. खरीप हंगामात खते व बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी, वजने मापे निरीक्षक, कृषि अधिकारी पंचायत तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी, कृषि उपसंचालक, मोहिम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजने मापे निरीक्षकांचा पथकात समावेश राहणार असल्याची माहिती जि.प.चे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली. शेतकर्‍यांनी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जवळच्या उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सोयाबीनचे घरचे बियाणे वापरा…

खरीप हंगामात शेतकर्‍यांनी सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे. उगवण क्षमता चाचणी तपासणी घरच्या घरी करावी. उगवण क्षमता चाचणी करताना 100 बिया ओल्या गोणपाटात रुजवायल्या ठेवाव्यात. 70 टक्क्यापेक्षा जास्त बिया उगवल्यानंतर ते बियाणे पेरणीसाठी चांगले आहे. बियाणे पेरणी करण्यापूर्वी बीज पक्रिया आवश्यक आहे. बियाणांसाठी 3 ग्रॅम बुरशी नाशक थायरम प्रत्येकी 1 किलो बियाणाला चोळणे आवश्यक आहे. रायजोबियम या जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

खते बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी

शासन मान्य अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून बियाणे, किटकनाशके, खतांची खरेदी करावी. बनावट, भेसळयुक्‍त, बोगस बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्के बिल स्वत:च्या व दुकानदारांच्या स्वाक्षरीसह घेवून बियाणाचे पाकीट, पिशवी ही सिलबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावर अंतिम मुदत पाहून खरेदी करा. वेगवेगळ्या वाणाचे, लॉटचे बियाणे एकत्र करुन पेरणी करु नये.

Back to top button